अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकच्या विनोदबुद्धीला लॉकडाउनच्या काळात चांगलाच वाव मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सोशल मीडियावरील त्याच्या एकापेक्षा एक भन्नाट पोस्टनी नेटकऱ्यांपासून कलाकारांनाही खळखळून हसवलंय.  मग यात कधी लॉकडाउनवर तर कधी बायकोवर त्याने मजेशीर पोस्ट लिहिली आहे. प्रसादने नुकताच एक फोटो पोस्ट करत लॉकडाउनमध्ये उपयुक्त असा सुखी संसाराचा मूलमंत्र सांगितला आहे.

त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये लिहिलंय, ‘बायकोचा राग आला तर तो गिळा.. नाहीतर गिळायला मिळणार नाही.’ प्रसादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स लिहिल्या आहेत. अतिशय उपयुक्त असा सल्ला दिलात असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर हा ताजा अनुभव दिसतोय असं म्हणत दुसऱ्याने प्रसाद ओकची मस्करी केली.

याआधीही प्रसादने अशाच काही भन्नाट पोस्ट लिहिल्या होत्या. ‘शेवटची फुल पँट कधी घातली होती आठवतच नाहीये’, असं त्याने लिहिलं होतं. तर ‘काही गोष्टी ब्रह्मांडातून गायबच झालेत…१- कुठे आहात? २ – घरी कधी येणार? ३ – जेवायला आहात ना?’ या पोस्टमध्ये त्याने पत्नी मंजिरी ओकला टॅग केलं होतं.