गेल्या काही दिवसांपासून प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या सिनेमाचीच चर्चा आहे. पहिल्यांदा या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाची छोटीशी झलक पाहताना नेमकी या सिनेमाचा विषय आहे तरी काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येत होता. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या प्रश्नांची उत्तर मिळायला थोडीफार मदत होईल असेच म्हणावे लागेल.
आयफामध्ये या कलाकारांनी उमटवली पुरस्कारांवर मोहर
हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर अगदी अल्पावधीतच या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. २.५० मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये काटदरे नवरा, बायको आणि त्यांचा गतीमंद मुलगा यांचं त्रिकोणी कुटुंब दाखवण्यात आलं आहे. हे त्रिकोणी कुटुंब जपण्यासाठी पती- पत्नीला करावी लागणारी तडजोडही या ट्रेलर मधून दिसते. आयुष्याकडून प्रत्येक व्यक्तीच्या असणाऱ्या अपेक्षा, संसारासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जाण्याचा एक अनोखा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णी अर्थात मोहन काटदरे आणि शैला काटदरे यांना एक दिव्यांग मुलगा असतो, त्याचं नाव बच्चू. बच्चूची बुद्धी जरी लहान मुलांसारखी असली तरी त्याचं शरीर मात्र मोठ होत होतं. तरूण वयातील मुलांमध्ये ज्या काही तारूण्यसुलभ शारीरिक जाणिवा असतात तशा भावना त्याच्यामध्येही जागृत झालेल्या असतात. पण त्याची पूर्तता कशी करावी हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर आणि पर्यायाने त्याच्या आई- बाबांसमोर होता. ट्रेलरमध्ये आईकडेही त्याच नजरेने पाहणारा बच्चू पाहताना मनाला अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. एकीकडे आई-बाबांची मनस्थिती तर दुसरीकडे त्या बच्चूच्या गरजा. ही तारेवरची कसरत काटदरे कुटुंब कशापद्धतीने करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
साध्या सरळ माणसांची ही स्पेशल गोष्ट तेवढ्याच खास पद्धतीने मांडण्यात आली आहे असे ट्रेलर पाहून प्रकर्षाने जाणवते. सिनेमासाठी निवडण्यात आलेली कास्टही तगडी आहे. सचिन खेडेकर, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी आणि मनमीत प्रेम अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात पाहायला मिळतेय. त्यामुळे खूप दिवसांनी एक उत्तर कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चिन्मय मांडलेकरच्या लेखणीतून उतरलेला हा सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण प्रेक्षकांच्या या अपेक्षांना हा सिनेमा खरा उतरतो की नाही हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
नागपुरातही काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, ‘इंदू सरकार’चं प्रमोशन रद्द
या सिनेमासाठी अनेकांनी चाकोरी बाहेरचा विचार करण्याचा निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर ‘टिपी’ आणि ‘बीपी’ सिनेमाचा दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमातून अभिनयात पदार्पण करत आहे. स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा.लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.