‘जाने तू या जाने ना’, ‘एक दीवाना था’, ‘धोबी घाट’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची प्रेयसी सान्या सागर हिच्याशी येत्या २२ जानेवारीला लखनऊ येथे त्याचा साखरपुडा होईल. ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा तो मुलगा आहे.

वाचा : …म्हणून विराट कोहली साखरपुड्याची अंगठी गळ्यात घालतो

प्रतिकला अमली पदार्थ सेवन करण्याची सवय होती. मात्र, गेल्याच वर्षी तो या विळख्यातून बाहेर पडला. त्यानंतर आता तब्बल तीन वर्षांनी ‘बागी २’ चित्रपटातून तो रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात प्रतिक खलनायकाची भूमिका साकारणार असून, तथाकथित प्रेमीयुगुल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यात मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

प्रतिकच्या साखरपुड्याविषयी ‘बॉम्बे टाइम्स’मध्ये आलेल्या माहितीनुसार, केवळ निकटवर्तीयांच्या उपस्थितीत प्रतिक – सान्याचा साखरपुडा होईल. प्रतिकला कोणताही गजबजाट नको असल्यामुळे दोन्ही कुटुंबांकडून साखरपुड्याविषयी गुप्तता बाळगण्यात येत आहे. साखरपुडा लखनऊमध्ये होणार असला तरी तारखेत बदल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जातेय.

वाचा : जाणून घ्या, देव पटेलमुळे राधिका आपटे ट्रेण्डमध्ये येण्यामागचे कारण..

गेल्या आठ वर्षांपासून प्रतिक आणि सान्या एकमेकांना ओळखत आहेत. मात्र, गेल्याच वर्षी लंडन येथे सान्या तिचे शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. तिच्याबद्दल फार काही माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी ‘आयएमडीबी बायो’नुसार (IMDb bio) लखनऊ येथे १ मे १९९० रोजी झाला. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून प्रशिक्षण घेतल्यानतंर तिने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध व्यक्तींसोबत सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

Story img Loader