बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसत असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याची तुलना काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिजशी केली जात आहे. तसेच अभिषेकची तुलना देखील ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्ये हर्षद मेहता यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतिक गांधीशी होत आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये प्रतिकने होणाऱ्या तुलनेवर वक्तव्य केले आहे.

प्रतिकेने नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने होणाऱ्या तुलनेवर वक्तव्य केले आहे. ‘मला वाटत नाही की कधी दोन व्यक्ती विशेषत: कलाकारांची तुलना होऊ शकते. कारण माणसं वेगवेगळी असतात. प्रत्येक माणूस वेगवेगळा विचार करतो, प्रत्येक माणसाचा वेगळा अनुभव असतो. त्यामुळे कोणत्याच तुलनेला अर्थ नाही. दोन्ही कलाकार वेगळे आहेत. स्क्रीप्ट आणि त्यातील पात्रांनुसार त्यांच्याकडे पाहिले गेले पाहिजे’ असे प्रतिक म्हणाला.

प्रतिकने अद्याप अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट पाहिलेला नाही. पण चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने सांगितले आहे. ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच सीरिजमधील प्रतिक गांधीच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. पण आता ‘द बिग बुल’ हा अभिषेकचा चित्रपट प्रदर्शित होताच त्याची तुलना प्रतिक गांधीशी केली जात होती.

८ एप्रिल रोजी ‘द बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.