बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवून देखील अभिनेत्री प्रिती झिंटा बॉलिवूडपासून गेल्या काही वर्षांपासून दूर आहे. सध्या प्रिती सिमलामधील तिच्या फार्म हाउसवर वेळ घालवतेय. नुकताच प्रितीने तिच्या फार्महाउसमधील सफरचंदाच्या बागेत फेरफटका मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात झाडांना लगडलेले सफरचंद पाहून तिला आनंद झाल्याचं पाहायला मिळतंय.
प्रितीने चाहत्यांसोबत हा व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केलाय. एवढचं नव्हे तर आता ती शेतकरी झाल्याचं या व्हिडीओत म्हणालीय. प्रितीने तिच्या पोस्टमध्ये पाऊस थांबताच हा व्हिडीओ शूट केल्याचं म्हंटलं आहे. लहानपणीपासून प्रिती आपल्या आजी-आजोबा आणि मामा-मामींकडे हिमाचल प्रदेशमध्ये भेट देण्यास जायची. त्यानंतर पुन्हा एकदा सिमलामध्ये येऊन बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचं ती म्हणालीय. या व्हिडीओत प्रितीने सफरचंदाच्या बागेचा फेरफटका मारला आहे. यावेळी “आता मी शेतकरी झाले आहे. मी इथे येत राहिन” असं म्हंटलं आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “भावा हिंदी येते का?”, जेव्हा तरुणाने नीरज चोप्राला विचारला इंग्रजीत प्रश्न
लग्नानंतर प्रिती अमेरिकेला स्थायिक झाली. अनेकदा ती अमेरिकेतील तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये येऊनही प्रितीला आनंद झाल्याचं या व्हिडीओत दिसतंय. पोस्टमध्ये प्रितीने तिच्या आठवणींना उजाळा दिलाय. सफरचंद तोडणं, लहान आणि मोठ्या आकाराचे सफरचंद वेगवेगळे करणं यासोबतच सफरचंदाचा ज्यूस बनवणं ही सगळी आवडती कामं होती असं ती म्हणालीय. “दोन वर्षांपूर्वीच मी अधिकृतरित्या शेतकरी झाले आहे. मला हिमाचल प्रदेशच्या सफरचंद शेतकरी गटाचा भाग झाल्याचा आनंद आहे.” असं ती पोस्टमध्ये म्हणाली.