चित्रपटगृहांच्या मालकांविरुद्धची मनसेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिला आहे. मराठी चित्रपट ‘देवा’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले आहे. येत्या २२ तारखेला अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, या दोन्ही चित्रपटांना सलमानच्या चित्रपटाच्या तुलनेत मिळणाऱ्या प्राइम टाइम शोची संख्या कमी असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

मनसेने हा मुद्दा उचलून धरला असून काही नेतेमंडळींनीही याविषयी आपले मत मांडत मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात त्यांच्या हक्काची चित्रपटगृह आणि प्राइम टाइम शो उपलब्ध झालेच पाहिजेत, असे ठाम मत मांडले आहे. ‘चित्रपटगृह मालकांना मनसेने दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणत्याही अडथळांशिवाय ‘टायगर जिंदा है’च्या प्रदर्शनासाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवावी किंवा मनसेच्या गुंडांचा सामना करण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर बाऊन्सर्सना नियुक्त करण्याची परवानगी द्यावी,’ असे ट्विट निरुपम यांनी केले.

वाचा : …तर महाराष्ट्रात ‘यशराज’च्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही- अमेय खोपकर

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात नुकतीच पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. मराठी चित्रपटांना स्क्रीन न देणाऱ्या चित्रपटगृहांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी या परिषदेत केली. त्याचप्रमाणे ‘यशराज फिल्म्स’च्या चित्रपटांचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.