मुस्लिम समाजातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्येवर भाष्य करणारा ‘हलाल’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी शासनाकडून तब्बल सहा पुरस्कार मिळवणाऱ्या आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत मजल मारणाऱ्या या चित्रपटाचे सयाजी शिंदे यांनी कौतुक केले आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्रात पहिल्यांदाच उतरलेल्या अमोल कंगने यांनी संवेदनशील विषय निवडण्याचे दाखवलेले धाडस, दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी केलेली मांडणी आणि राजन खान यांच्या लिखाणासह कलाकारांचा दमदार अभिनय अशा सर्वच गोष्टी उत्तमरित्या जुळून आल्याचे त्यांनी सांगितले.

‘हलाल’ चित्रपटाच्या प्रिमियरनंतर लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी या चित्रपटाविषयीचे मत मांडले. प्रथा कोणत्या धर्मातील आहेत यापेक्षाही या पारंपारिक प्रथांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो, हा मुद्दा महत्त्वाचा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जी महिला आपल्याला जन्म देते त्याच महिलेविरुद्ध आपण आयुष्यभर का भांडतो, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हिंदू धर्मातील सती प्रथेचा दाखला देत ते म्हणाले की, पूर्वीच्या काळात राजाच्या अनेक पत्नी असायच्या. त्याच्या निधनानंतर या स्त्रियांना सती जायला भाग पाडले जायचे. एवढेच नाही तर, आपल्या पत्नींवर दुसऱ्या कोणी नजर ठेवू नये, या मानसिकतेतून काही राजे युद्धावर जाण्यापूर्वी आपल्या पत्नींना मारुनही टाकायचे, अशा कथा ऐकल्या आहेत. आजच्या घडीला आपण सुधारतोय की अधिक प्रतिगामी होतोय , असा प्रश्न हा चित्रपट पाहिल्यानंतर पडतो. समाजातील वाईट परंपरांना तिलांजली देऊन बदल घडवण्याचा महत्त्वाचा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. एखाद्या धर्मात महिलेला इतक्या खालच्या पातळीची वागणूक दिली जाते, हे संतापजनक आहे. समाजात घडणाऱ्या या घटनांना आळा घालायला हवा. हा बदल घडवणे आपली जबाबदारी आहे, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.