अक्षय कुमार पहिल्यांदाच एका मोठ्या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारणार आहे. यशराज प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारतो आहे. मात्र या चित्रपटालाही लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. दहीसर येथे कोट्यवधी रुपये खर्चून चित्रपटाचा मोठा सेट उभारण्यात आला. मात्र आता मुंबईत मान्सून दाखल होण्यापूर्वी हा सेट पाडण्यात येणार असल्याचं कळतंय. ‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचा संपूर्ण सेट पाडण्याची तयारी सुरू झाली आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने गेले दोन महिने वाट पाहिली. दोन महिन्यांनंतर कदाचित शूटिंगला सुरुवात होईल, या आशेने त्यांनी सेट तसाच ठेवला होता. मात्र आता मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. आधीच लॉकडाउनमुळे झालेलं नुकसान आणि त्यात पावसामुळे होणाऱ्या सेटच्या नुकसानीची भर पडायला नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत. आत्तापर्यंत डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित के लेल्या ऐतिहासिक मालिका प्रचंड यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे आता अक्षयलाही या चित्रपटासाठी प्रचंड तयारी करावी लागते आहे. या चित्रपटात विश्वसुंदरी मानुषी छिल्लर ही पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीच्या महाराणी संयुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराजच्या नियोजनानुसार चित्रपटाचे काम झाले तर यावर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसचं संकट आणि लॉकडाउन यामुळे चित्रपटाचं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात येऊ शकतं.