सचिन कुंडलकरच्या वजनदार सिनेमासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी वजन कमवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे साऱ्यांनीच कौतुक केले. पण जेव्हा या दोघी वजन वाढवत होत्या तेव्हा मात्र त्यांना वेगवेगळ्या प्रसंगानाच सामोरं जावं लागत होतं. जेव्हा वजनदार सिनेमासाठी प्रिया जाड होतं होती तेव्हा तिच्या नातेवाईकांना तिचं ते जाडेपण पाहून ती गरोदर आहे की काय असंच वाटत होतं. तिला तसे नातेवाईकांचे फोनही यायचे. मग काय बिचाऱ्या प्रियाला ती जाड का होतेय हे प्रत्येकालाच सांगावं लागायचं. पण एवढंच विचारून लोकं थांबली नाहीत. पुढे त्यांनी तिला मुलगा झाला की मुलगी असा प्रश्नही विचारला.

नातेवाईकांच्या या प्रश्नावर प्रियाकडेही उत्तर ठरलेलं होतं. शुक्रवारी ११ तारखेला तिची डिलिव्हरी होणार आहे. वजनदार नावाचं हे बाळ तुम्हाला नक्की आवडेल असंही ती सांगते.

‘हॅप्पी जर्नी’, ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमांनंतर सचिन कुंडलकर पुन्हा एकदा वेगळा विषय आणि मांडणी असलेला सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टी, प्रसंग यावर मी सिनेमा करत आलो आहे. ‘वजनदार’ सिनेमाचा विषयही गेली अनेक वर्षे डोक्यात घोळत होता. हल्ली माणसे ‘आपण कसे आहोत’ यापेक्षा ‘आपण कसे दिसतो’यावर जास्त भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. असण्यापेक्षा दिसण्याकडे त्यांचे जास्त लक्ष असते. वजन कमी करण्यासाठी आणि सडपातळ होण्यासाठी दोन मैत्रिणी काय काय करतात त्याचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने ‘वजनदार’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जाड्या माणसांवरील विनोदी सिनेमा असे त्याचे स्वरूप नाही. तर त्यापेक्षा वेगळे काही यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.