व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असून, सध्या या प्रेमाला दाक्षिणात्य टच मिळाला आहे असं म्हणावं लागेल. प्रेम ही एक अशी भावना आहे, जेथे भाषा, प्रांत या सर्व गोष्टी अगदी नगण्य होतात. अचानक प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण ठरतेय, अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. सोशल मीडियावर हे नाव सध्याच्या घडीला अनेकांच्या सर्चलिस्टमध्ये अग्रस्थानी असून, तिच्या फोटोंचा संग्रहच जणू फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय. अवघ्या काही क्षणांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे.

मल्ल्याळम भाषेची गोडी असणाऱ्या या गाण्यात अवघ्या काही सेकंदांसाठी प्रियाची झलक दिसत असून तिच्या डोळ्यांवर आणि खोडकर हसण्यावर फक्त तरुणांचीच नाही तर तरुणींचं भानही हरपलं आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटासाठी प्रियाची सहाय्यक अभिनेत्री म्हणून निवड करण्याच आल्याचं वृत्त ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलं आहे. ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटात तिला एका छोट्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं. पण, कालांतराने अभिनय कौशल्य पाहून मुख्य भूमिकेसाठी तिची वर्णी लागली आणि त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहेतच. त्यामुळे प्रियाच्या वाट्याला आलेल्या या संधीचं तिने खऱ्या अर्थाने सोनं केलं असंच म्हणावं लागेल कारण ही संधी तिला मिळाली नसती तर, आज प्रिया ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे, तसं काही होण्याची शक्यताही नसती.

सोशल मीडियावर लोकप्रियतेची सर्व गणितच बदलणाऱ्या ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्याशी मल्ल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचंही नाव जोडलं गेलं आहे. मोहनलाल यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘जिम्मिकी कमल’ या गाण्याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्याला शान रहमानने संगीतबद्ध केलं होतं. मुळात मल्ल्याळम भाषेत असणाऱ्या ‘जिम्मिकी कमल’ या गाण्याचे बोल जास्त कोणाला कळले नसले तरीही शान रहमानने गाण्याला दिलेल्या संगीताने सर्वंचीच मनं जिंकली.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

शानच्या संगीताची जादू ‘मनिक्य मलरया पूवी’च्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. ‘जिम्मिकी कमल’च्याच गायकाने म्हणजेच विनिथ श्रीनिवासनने ‘मनिक्य मलरया पूवी’ हे गाणं गायलं आहे. त्यामुळे कुठेतरीह ‘जिम्मिकी कमल’ आणि शान, विनिथच्या लोकप्रियतेचा फायदा प्रियाच्या या गाण्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत युट्यूबवर या गाण्याला ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे. त्यामुळे सरळ साधी आणि तितकीच सुरेख केमिस्ट्री एका विक्रमी दिशेने वाटचाल करतेय असं म्हणावं लागेल.

शानने संगीतबद्ध केलेलं ‘जिम्मिकी कमल’ एकदा ऐकाच…