अत्यंत कमी वेळात जबरदस्त प्रसिद्धी मिळवणारी प्रिया वारियर अनेकांच्याच परिचयाची झाली आहे. तिने अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलं नाही, पण त्यापूर्वीच एखाद्या बड्या सेलिब्रिटीप्रमाणे तिची प्रसिद्धी आहे. यासाठी कारण होतं, तिच्या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या ट्रेलरमधील व्हायरल झालेला व्हिडिओ. ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यात प्रिया तिच्या प्रियकराला नजरेच्या एकाच बाणाने घायाळ करताना दिसते. डोळे मारण्याच्या हावभावामुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली होती. पण आता तिचं हेच डोळे मारणं तिच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. इस्लाममध्ये डोळा मारणं अयोग्य असल्यामुळे हैदराबादमध्ये प्रियाविरोधात दोन पक्षांनी याचिका दाखल केली आहे.

फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील एका स्थानिक संघटनेने, प्रियाचा आगामी ‘उरू अदार लव’ या सिनेमामधून मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. सिनेमाचे दिग्दर्शक ओमर लुलु यांच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रारही नोंदवली होती. प्रियाने ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासंबंधी याचिका दाखल केली होती.

४० वर्ष जुने गाणेः
प्रियाने आपल्या याचिकेमध्ये सांगितले की, हे सुमारे ४० वर्ष जुने गाणे आहे. आतापर्यंत या गाण्यावर मुस्लिम समुदायाने कोणतीही आपत्ती दाखवली नव्हती. त्यामुळे आता अचानक हे गाणे कोणाच्याही भावना दुखावू शकत नाही.  याआधीही हैदराबादमधील मुस्लिम युवकांच्या समुहाने प्रिया आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच रजा अकादमीने या सिनेमावर बंदीची मागणी केली होती. या अकादमीने मुंबई पोलीस आयुक्त आणि सेन्सॉर बोर्डाला या सिनेमावर बंदी आणण्याबद्दल लिखीत तक्रार केली होती.

प्रियाला संगीत आणि नृत्य या दोन्ही गोष्टींमध्ये कमालिचा रस आहे. तिने मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून गायनाचेही ती प्रशिक्षण घेत आहे. तिला बॉलिवूड गायकांमध्ये अरिजीतचा आवाज फार भावतो. त्यातही अरिजीतचे ‘चन्ना मेरेया’ हे गाणे सर्वाधिक आवडते. सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. प्रिया आई- बाबा, छोटा भाऊ आणि आजी- आजोबा अशा माणसांनी भरलेल्या घरात राहते.