मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर हे नाव काही दिवसांतच अनेकांच्या परिचयाचं झालं. काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्धी मिळवली. पण या प्रसिद्धीसोबतच ‘उरु अदार लव्ह’ चित्रपटाच्या निर्मात्यांना एका वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागत आहे. चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यावर आक्षेप घेत हैदराबादमध्ये मुस्लीम युवकांच्या समुहाने प्रिया आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत हैदराबाद पोलिसांनी दिग्दर्शक ओमर लूलू यांना नोटीस बजावली आहे. ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर उत्तर देण्यास पोलिसांनी सांगितले आहे.

या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याविषयी स्पष्टीकरण देताना एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ओमर लूलू म्हणाले की, ‘मोहम्मद पैगंबर यांची पहिली पत्नी खदीजा बिंत ख्वालिद यांच्या स्वभावगुणांचं वर्णन या गाण्यात केलं आहे. जगभरातील लोक या गाण्याला पसंत करत असतानाच काहींनी यावर आक्षेप घेतला आहे.’

गाण्याचा टीझर सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि अवघ्या काही दिवसांमध्येच प्रिया प्रकाशझोतात आली. या व्हिडिओमध्ये प्रिया तिच्या शाळकरी मित्राला नजरेच्या हावभावांनी प्रेम व्यक्त करताना दिसते. तिच्या याच हावभावांनी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला.