बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा राखणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या रडारवर आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेतील एका एपिसोडवर भारतीयांनी आक्षेप घेतला असून अनेकांनी सोशल मीडियावर त्या मालिकेला आणि प्रियांकाला ट्रोल केलं. मालिकेच्या निर्मात्यांनी दिलगिरी व्यक्त करत हा विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता देसी गर्ल प्रियांकाने या विषयावर मौन सोडत ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली.
”क्वांटिको’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागाच्या कथानकामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा कधीच हेतू नव्हता आणि भविष्यातही नसणार. मी दिलगिरी व्यक्त करते. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि ते कधीच बदलणार नाही,’ असं ट्विट प्रियांकाने केलं आहे.
I’m extremely saddened and sorry that some sentiments have been hurt by a recent episode of Quantico. That was not and would never be my intention. I sincerely apologise. I'm a proud Indian and that will never change.
— PRIYANKA (@priyankachopra) June 9, 2018
वाचा : ‘ही’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकण्यास सज्ज
१ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणूबॉम्बने हल्ला करण्याचा कट एक एमआयटी (MIT) प्राध्यापक रचत असल्याचे दाखवण्यात आले. हा दहशतवादी एक भारतीय असल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. पाकिस्तानवर दोष देऊन भारतीय दहशतवादी परिषदेवर हल्ला करणार असल्याचे मालिकेचे कथानक होते. याच कथानकावरून भारतीयांनी सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आणि संताप व्यक्त केला होता.