‘क्वांटिको’चं चित्रिकरण संपवून भारतात परतलेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या गोव्यामध्ये कथित प्रियकर निक, बहिण परणीती आणि भाऊ सिध्दार्थ यांच्याबरोबर सुट्टी एन्जॉय करत आहे. या ट्रिपमधील प्रत्येक अपडेट प्रियांका तिच्या चाहत्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून देत आहे. त्यामुळे आतापर्यंत या ट्रिपमधले अनेक फोटोज, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो ज्या वेगाने व्हायरल होत आहेत त्यापेक्षा कैक पटीने प्रियांका आणि निक जोनास यांच्या नात्याविषयीच्या चर्चा रंगत आहेत. मात्र या नात्यावर प्रियांकाने नुकताच एक खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या प्रियांका आणि निक हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहेत. त्यातच प्रियांकाच्या आईने निकची भेट घेतल्यामुळे निक-प्रियांकाच्या नात्याची चर्चा आता हॉलिवूडमध्येही होऊ लागली आहे. या चर्चा रंगत असतानाच त्यात आणखी एक नवी भर पडली असून प्रियांका-निक जुलैमध्ये साखरपुडा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रियांका-निकने मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रियांका सध्या गोव्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असतानाच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. शेअर करण्यात आलेल्या या फोटोला प्रियांकाने जे कॅप्शन दिलं आहे. ते पाहून प्रियांकाने निक आणि तिच्या नात्यावर भाष्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ आणि कथित प्रियकर निक समुद्रकिनाऱ्यावर उभे आहेत. यावेळी समुद्राकडे पाहणाऱ्या या दोघांचा फोटो प्रियांकाने काढला आहे. तसंच तो शेअर करत त्याला ‘माय फेव्हरेट मॅन’ My favourite men असं कॅप्शन तिने दिलं आहे. प्रियांकाचं हे कॅप्शन पाहता तिच्यासाठी निक किती महत्वपूर्ण आहे हे दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी निकनेदेखील एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने प्रियांकाप्रतीचे प्रेम व्यक्त केले होते. त्यानंतर आता प्रियांकाने हा फोटो शेअर करत एकप्रकारे निकच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे असं दिसून येत आहे.