अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मियामीमध्ये पती निक जोनाससोबत तिचा क्वालिटी टाइम घालवत आहे. काही दिवसापूर्वी मियामीमध्ये प्रियांकाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात प्रियांकाचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला. या फोटोमुळे तिला ट्रोलही व्हावं लागलं होतं. या फोटोनंतर आता प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मियामीमध्ये प्रियांका पार्टी करत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याचं दिसून येत आहे.

मियामीमध्ये निक आणि प्रियांकासोबत तिची आई मधू चोप्रादेखील आहे. प्रियांकाचा वाढदिवस असल्यामुळे निकने प्रियांकाला एक खास सरप्राईज दिलं. यावेळी एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी सुरु असताना प्रियांकाचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. यावेळी निकने प्रियांकाचा पाय पकडून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील ती पडली. येथे प्रियांकाने अनेक वॉटरस्पोर्टचा आनंद घेतला असून तिचे जेट स्की चालवतानाचे अनेक फोटो सध्या चर्चेत आहेत.

दरम्यान, सुट्टी एन्जॉय करत असलेली प्रियांका लवकरच ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता फरहान अख्तर स्क्रीन शेअर करणार आहे.