बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रियांका चोप्रा. बॉलिवूडच्या या देसी गर्लने Priyanka Chopra नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची जर्मनीतील बर्लिन शहरात भेट घेतली. प्रियांका आगामी ‘बेवॉच’ चित्रपटाने हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या याच चित्रपटाची ती सर्वत्र प्रसिद्धी करत असून, त्यादरम्यानच तिने मोदींची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो तिने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, मला भेटण्यासाठी तुमच्या व्यस्त कामातून वेळ काढण्याकरिता मी तुमची आभारी आहे. आपण दोघही एकाच वेळी बर्लिनमध्ये असण्याचा सुंदर योगायोग जुळून आला.

पंतप्रधान मोदी जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर सोमवारी रवाना झाले. या देशांशी असलेले आर्थिक संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा दौरा आहे. काल संध्याकाळी मोदी जर्मनीत दाखल झाले असून जर्मनीतील विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. जर्मनीत मोदी चान्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांच्याशी चर्चा करणार आहेत. जर्मनीचे अध्यक्ष फ्रॅन्कवॉल्टर स्टेइनमेइर यांचीही ते भेट घेतील.

येत्या २ जूनला प्रियांकाचा ‘बेवॉच’ चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. ड्वेन जॉन्सन आणि प्रियांकाचा हा चित्रपट सध्या भारताबाहेर प्रदर्शित झाला असून, समीक्षकांची याला पसंती मिळालेली नाही. परंतु, या चित्रपटातील प्रियांकाच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे.