लॉस एन्जेलिस येथे झालेल्या ६९व्या ‘प्राइमटाइम एमी’ पुरस्कार सोहळ्याला टीव्ही आणि हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही धमाकेदार एन्ट्री केली. ‘बालमेन’ या फॅशन ब्रॅण्डचा सुंदर पांढरा गाऊन तिने परिधान केला होता. आपल्या ड्रेसिंगसाठी नेहमीच नावाजल्या जाणाऱ्या देसी गर्लने यावेळीही रेड कार्पेटवरील तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. या पुरस्कार सोहळ्यानंतर प्रियांका आणखी एका कारणासाठी चर्चेत आली. कार्यक्रमात निवेदिकेने प्रियांकाच्या नावाचा चुकीचा उच्चार केला आणि यामुळेच प्रियांकाचे चाहते नाराज झाले आहेत.

‘आऊटस्टँडिंग व्हरायटी टॉक सीरिज’ हा पुरस्कार सादर करण्यासाठी ती अभिनेता अँथनी अँडरसनसोबत स्टेजवर पोहोचली. त्यावेळी निवेदिकेनं प्रियांकाच्या आडनावाचा चुकीचा उच्चार केला. प्रियांका चोप्राऐवजी प्रियांका चोपा असं तिनं म्हटलं. यानंतर ट्विटरवर या ‘देसी गर्ल’च्या चाहत्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली.

‘प्रियांका चोप्रा या नावाचा उच्चार करणं खरंच इतकं अवघड आहे का?,’ असा खोचक सवालही एका यूजरने केला. तर प्रियांकाने यावर कोणताच आक्षेप घेतला नाही, पण मोजक्या शब्दांत भाषण देऊन तिथल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.

वाचा : ना शाहरुख, ना सलमान; स्मृती मंधानाला ‘या’ बॉलिवूड स्टारला डेट करायचंय!

वाचा : अन् एका सुरेख प्रेमकहाणीचा होणार दुर्दैवी अंत?

अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’ची मुख्य अभिनेत्री प्रियांका दुसऱ्यांदा ‘एमी’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर झळकली. गेल्या वर्षी तिने ‘अॅवेन्जर्स’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता टॉम हिडलस्टनसोबत पुरस्कार सादर केला. हॉलिवूडचे बरेच प्रोजेक्ट्स सध्या तिच्याकडे असून ‘अ किड लाइक जॅक’ आणि ‘इजंट इट रोमॅन्टिक’ या दोन चित्रपटांमध्ये ती भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच ‘क्वांटिको’च्या तिसऱ्या सिझनमध्येही ती झळकणार आहे.

Story img Loader