ऑस्कर विजेता संगीत दिग्दर्शक एआर रेहमानचा लंडनमध्ये नुकताच एक कॉन्सर्ट झाला. हा फक्त तमिळ गाण्यांचाच कॉन्सर्ट होता. पण हिंदी गाणीही ऐकायला मिळतील या अपेक्षेने अनेक प्रेक्षक आले होते. पण रेहमान जास्तीत जास्त तमिळ गाणी गात असल्याचं लक्षात येता प्रेक्षकांनी थिएटरमधून काढता पाय घेण्यास सुरूवात केली. रेहमानच्या उत्तरेकडील चाहत्यांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली.
या सिनेमावेळी श्रीदेवी, रजनीकांतवर थुंकली होती
या प्रकरणावर प्रियांकाचं मत विचारले असता ती म्हणाली की, ‘हे खूपच वाईट आहे. मला या प्रकरणाबद्दल फारसं काही माहित नाही. त्यामुळे मी यावर फार काही बोलू शकत नाही. जर मी यावर काही बोलले तर तुम्ही त्याहून जास्तच लिहाल. म्हणून मी एवढंच म्हणू शकते की जे काही झालं तो खरंच उद्धटपणा होता.’
जावेद अख्तर यांनीही या घटनेचा तीव्र विरोध केला. ‘कोणत्याही भाषेचा उपयोग हा संवादासाठी केला जातो. पण सद्य परिस्थितीत भाषाच संवादामधील मोठी दरी झाली आहे. जर तो तमिळ गाण्यांचा कॉन्सर्ट असेल तर त्यात हिंदी गाणं कसं असेल. प्रेक्षकांनी याचा आधी विचार करायला हवा होता. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, अशा पद्धतीची वागणूक भविष्यासाठीही हानिकारक आहे.
मला मान्य आहे की एखादी भाषा कळत नसेल तर त्या भाषेतला कार्यक्रम बघायला कोणालाही कंटाळा येणार. पण एआर रेहमान हा काही फक्त भारतीय संगीतकार नाही तर तो एक जागतिक दर्जाचा संगीतकार आहे. संगीताला भाषा नसते. पण ती समजून घेण्याची समज आणि संयम आवश्यक असतो जो तिथे उपस्थित प्रेक्षकांमध्ये दिसून आला नाही,’ असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
या कॉन्सर्टसाठी रेहमान खास चेन्नईहून लंडनला गेला होता. त्याला मद्रासचा ‘मॅझार्ट’ म्हटले जाते. त्याला या कॉन्सर्टमध्ये हा विशेष पुरस्कारही देण्यात आला. त्याने पुरस्काराचा स्वीकार करून तमिळमध्ये भाषण दिले. त्याच्या बॉलिवूड चाहत्यांना त्याची कित्येक हिंदी गाणी अगदी तोंडपाठ आहेत. पण रेहमानची ओळख फक्त हिंदी भाषेत नसून ती इतर भाषांमध्येही आहे. त्याची खरी ओळख तर तामिळ सिनेमांपासूनच झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
मणी रत्नम यांच्या ‘रोजा’ या तमिळ सिनेमापासून त्याच्या सांगितिक प्रवासाला सुरूवात झाली. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘जेन्टलमन’, ‘बॉम्बे’ ते ‘ओ कधाई कनमनी’ या तमिळ सिनेमांच्या संगीताच्या आजही चाहते प्रेमात आहेत. तमिळ आणि हिंदी सिनेमांशिवाय रेहमानने तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी सिनेमांसाठीही वैविध्यपूर्ण संगीत दिले आहे.