बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियांका चोप्राने Priyanka Chopra मंगळवारी बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची भेट घेतली. प्रियांकाने या भेटीचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावरील वातावरण तापल्याचे दिसतेय. या फोटोंमुळे तिला संस्कारांची आणि शिष्टाचारांची शिकवण देण्यास काहीजणांनी सुरुवात केली. पण प्रियाकांनेही या टीकाकारांना सूचक पण सडेतोड उत्तर दिले.

पंतप्रधानांची भेट घेतवेळी प्रियांकाने शॉर्ट ड्रेस घातला होता. मोदी हे केवळ भारताचे पंतप्रधान नसून ते तिच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. असे असताना ती अशाप्रकारे शॉर्ट ड्रेस घालून त्यांच्यासमोर कशी बसू शकते, असा प्रश्न काही नेटिझन्सनी उपस्थित केला. त्याचबरोबर देशाच्या प्रमुखांसमोर बसताना काही शिष्टाचार आणि संकेत असतात. त्यामध्ये मांडीवर मांडी ठेवून बसत नाही. प्रियांका मात्र त्याच स्थितीत बसल्यामुळेही तिच्यावर काही जणांकडून टीकेचा भडीमार करण्यात येतो आहे. देशाच्या पंतप्रधानांसमोर कसे बसायचे तुला माहिती नाही का? तुला आपल्या कृतीबद्दल खेद वाटत नाही का, असे प्रश्न तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येत आहेत. मात्र, प्रश्न विचारणाऱ्यांना थेटपणे कोणतेही उत्तर न देता प्रियांकाने आपल्या कृतीतून त्यांच्या टीकेचा समाचार घेतला.

प्रियांकाने शॉर्ट ड्रेस घालून आपल्या आईसोबत बसल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्येही शॉर्ट ड्रेसमुळे तिच्या मांडी खालचा पाय उघडा असल्याचे दिसते आहे. जन्मदात्या आईसमोरच अशा पद्धतीने बसल्यामुळे प्रियाकांने टीकाकारांची तोंडं गप्प केली आहेत. आईसोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना प्रियांकाने Legs for days…. #itsthegenes with @madhuchopra nights out in #Berlin #beingbaywatch. असे लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना प्रियाकांने लिहिले आहे की, देशाचे पंतप्रधान बर्लिनमध्ये असताना मी सुद्धा त्याच शहरात असणे हा किती छान योगायोग आहे. तुमच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढून सकाळी सकाळी भेटण्यासाठी मला वेळ दिल्याबद्दल नरेंद्र मोदी सर तुमचे खूप धन्यवाद.