अभिनय, गायन याशिवाय निर्मिती क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सामाजिक कार्यातही अग्रणी आहे. आपल्या व्यग्र जीवनशैलीतून  वेळ काढून ती सामाजिक कार्यही करते. गेल्या १२ वर्षांपासून प्रियांका यूनिसेफशी जोडली गेली आहे. ‘यूनिसेफ’ची ‘गुडवील अॅम्बेसिडर’ म्हणून ती कित्येक वर्षे काम करत आहे. नुकतीच तिने जॉर्डनची राजधानी अमानला भेट दिली. रविवारी ती ‘यूनिसेफ’च्या ‘जॉर्डन कंट्री ऑफिस’मध्ये मुलांना भेटली. तेथील मुलांकडून अरबी भाषा शिकत त्यांच्यासोबत खेळतानाही ती दिसली. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची माहिती दिली.

तिचे हे समाजकार्य काहींना पसंत आले नाही. काही युझर्सनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण आपण कोणाला ट्रोल करत आहोत हे कदाचित ते विसरले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रियांकाने सडेतोड उत्तर दिले. रविंद्र गौतम नावाच्या एका युझरने ट्विटरवर लिहिले की, ‘प्रियांकाला देशातील खेड्यापाड्यातही गेले पाहिजे. तिथली मुलंही उपाशी असून जेवण मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.’

रविंद्रला उत्तर देताना प्रियांका म्हणाली, ‘मी ‘यूनिसेफ’सोबत गेली १२ वर्षे काम करत असून अशा अनेक ठिकाणी गेले आहे. रविंद्र गौतम तू काय केले आहेस? एका मुलाचे दुःख दुसऱ्यापेक्षा कमी कसे असू शकते?’ असा थेट प्रश्न तिने रविंद्रला विचारला. ट्रोल होण्याची प्रियांकाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही प्रियांका तिच्या स्टाइल स्टेटमेंटवरुन आणि इतर गोष्टींवरुन ट्रोल झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाने अमेरिकन टीव्ही सीरीज ‘क्वांटिको’च्या दोन सीझनशिवाय ‘बेवॉच’ हॉलिवूडपटातदेखील काम केले आहे. लवकरच तिचे अन्य दोन हॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होणार असून ‘क्वांटिको’च्या तिसऱ्या सिझनमध्येही ती दिसणार आहे. सध्या प्रियांका आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. रिबेल विल्सन, लियाम हैम्सवर्थ, एडम डिवाइनसोबत ती ‘इजंट इट रोमँटिक?’ आणि ‘अ किड लाइक जेक’ या सिनेमात ती झळकणार आहे. ‘अ किड लाइक जेक’ या सिनेमात तिच्यासोबत जिम पार्सन्स, क्लेयर डेन्स, ओक्टाविया स्पेन्सर, ऐन डोड आणि मायकल वॉटरिंस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.