प्रियांका चोप्रा आणि माधुरी दीक्षित एका टिव्ही सीरिजमध्ये एकत्र काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. या सीरिजचे लेखक श्री राव यांनी ट्विटरवरून या बातमीला दुजोरा दिला. ‘या दोन प्रख्यात आणि दिग्गज व्यक्तींसोबत माझा नवीन प्रोजेक्ट सुरु करण्याबाबत मी खूप उत्साही आहे,’ असं श्री राव यांनी ट्विट केलंय. त्याचबरोबर माधुरी आणि प्रियांकासोबतचा त्यांनी एक फोटोदेखील शेअर केलाय.
या टिव्ही सीरिजची संकल्पना अत्यंत अनोखी असून यामध्ये माधुरी दीक्षितची कथा दाखवण्यात येणार आहे. एक बॉलिवूड स्टार जी युएसएला स्थायिक होते, परदेशात कुटुंबियांसोबतचं तिचं जीवन, जीवनातील अनेक अनुभव यांवर ही टिव्ही सीरिज आधारित असणार आहे. विशेष म्हणजे माधुरी स्वत: या शोची कार्यकारी निर्माती असून तिचा पती श्रीराम नेनेसुद्धा या प्रोजेक्टचा भाग असल्याची माहिती मिळतेय.
Thrilled to finally announce my exciting new project with these two legends and icons @MadhuriDixit @priyankachopra https://t.co/520RhMOrcU pic.twitter.com/W0pQGid2wD
— Sri Rao (@NewYorkSri) July 28, 2017
माधुरीसोबतच प्रियांका चोप्रासुद्धा या शोची कार्यकारी निर्माती आहे. मार्क गॉर्डन कंपनी Mark Gordon Company (MGC) आणि एबीसी स्टुडिओ ABC studios या शोचे निर्माते आहेत. प्रियांका आणि माधुरीशिवाय आणखी कोण या टिव्ही सीरिजमध्ये असतील याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. त्याचप्रमाणे ही एक कॉमेडी सीरिज असल्याचं म्हटलं जातंय.
वाचा : सुशांतकडून क्रितीला वाढदिवसाची सरप्राईज पार्टी?
प्रियांका जेव्हा भारतात आलेली तेव्हा याबद्दल ती म्हणालेली की, ‘टिव्ही सीरिजची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. सर्वकाही निश्चित झाल्यानंतर मी तुम्हाला याबाबत नक्की सांगेन. जवळपास एक वर्षापासून मी या सीरिजवर काम करतेय.’ या टिव्ही सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ आणि ‘देसी गर्ल’ एकत्र येणार आहेत. माधुरी दीक्षितचे जीवन या टिव्ही सीरिजच्या माध्यमातून जवळून पाहायला मिळणार हे नक्की.