नेहमीच वादविवाद, चर्चेत राहणारा आणि तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा अकरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सप्टेंबरमध्ये हा शो सुरु होणार असून ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण दिसणार याच्या अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. आपल्या बेसूर आवाजाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या ढिंच्याक पूजापासून अभिनेत्री नवनीत कौर ढिल्लनपर्यंत अनेक नावं पुढे आली आहेत. या नावांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडलीये, ती म्हणजे नवप्रीत बंगा.

मागील सिझनप्रमाणेच या अकराव्या सिझनमध्येसुद्धा सेलिब्रिटींव्यतिरिक्त काही सामान्य व्यक्तीसुद्धा सहभागी होणार आहेत. यामध्ये कॅनडाची फिटनेस व्हिडिओ ब्लॉगर नवप्रीत बंगाच्या नावाची चर्चा होतेय. आता एका फिटनेस व्हिडिओ ब्लॉगरला ‘बिग बॉस’च्या घरात निमंत्रित करायचे काय कारण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या नवप्रीतचं वैशिष्ट्य म्हणजे हुबेहूब प्रियांका चोप्रासारखी दिसते म्हणून सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. ही नवप्रीत बंगा हुबेहुब बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’प्रमाणेच दिसते. नवप्रीतला ‘बिग बॉस’च्या घरात आणण्यासाठी सध्या जोरात प्रयत्न सुरु आहेत.

PHOTOS : मुलगी आऱ्हासोबत अल्लू अर्जुनचा ‘पिक्चर परफेक्ट मोमेंट’

‘बिग बॉस ११’च्या इतर स्पर्धकांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन, ‘उतरन’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेला नंदीश संधू, ‘जमाई राजा’ मालिकेत भूमिका साकारलेली अंचित कौर यांची नावं चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे ‘हम साथ साथ है’ चित्रपटात नीलम आणि महेश ठाकूर यांच्या मुलीची भूमिका साकारलेली जोया अफरोज, अभिनेत्री नवनीत कौर ढिल्लन, ‘बडे अच्छे लगते है’मधील अभिनेता मोहित मल्होत्रा, ‘बेगम जान’ चित्रपटात भूमिका साकारलेली मिश्ती चक्रवर्ती, ‘एम टीव्ही स्प्लिटविला’मध्ये झळकलेला अभिषेक मलिक यांचीही नावे चर्चेत आहेत. यामध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्माच्या नावाचाही समावेश होता. मात्र या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं नियाने नंतर स्पष्ट केलं.