आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपास आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘क्वांटिको’ या सिरीजच्या पुढील भागाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझननंतर ‘क्वांटिको २’ मध्येही ती अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सीझनला मिळालेले यश पाहता या सिरीजचा पुढचा भाग बनवण्यात येत आहे. त्यामुळे सध्यातरी बॉलिवूडमध्ये कमीच दिसणारी ही देसी गर्ल विदेशवारीमध्ये व्यस्त आहे. बी टाऊनपासून प्रियांकाने काहीसा दुरावा ठेवला असला तरीही चाहत्यांच्या मनातून मात्र प्रियांकासाठीचे प्रेम तिळमात्रही कमी झालेले नाही.
‘क्वांटिको २’च्या चित्रिकरणासोबतच प्रियांका सध्या तिच्या नव्या घरात पाहुण्यांच्या पाहुणचार करण्यातही व्यस्त आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणाऱ्या प्रियांकाच्या नव्या घराचा फोटो पाहूनतरी असेच दिसत आहे. प्रशस्त वाटणाऱ्या या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी मोठ्या प्रेमाने काहीतरी बनवण्यासाठी ‘पिकी चॉप्स’ने स्वयंपाकघराची वाट धरली आहे. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी प्रियांकाच्या नव्या घराचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोसह त्यांनी प्रियांकाला उद्देशून ‘मला घरात येऊ दिल्याबद्दल धन्यवाद’ असे कॅप्शनही दिले आहे. त्यामुळे प्रियांकाचे अमेरिकेतील घर पाहण्यासाठी सोशल मीडियावर अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अनुपमा चोप्रा यांचा नवा शो आणि प्रियांकाच्या नव्या घराचे व्हायरल झालेले फोटो अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘क्वांटिको २’ च्या चित्रिकरणात व्यस्त असणारी प्रियांका एका नव्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. या सिरीजमध्ये तिच्यासह जॅक मॅकलाफलिन, जोहाना ब्रॅडी आणि यास्मिन अल मास्री यांच्याही भूमिका आहेत. याव्यतिरीक्त प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटासह हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत. येणाऱ्या काळात प्रियांकाच्या अभिनयाचा चढता आलेख पाहणे अनेकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे यात शंकाच नाही.