निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि बॉलिवूडमधील विविध सेलिब्रिटी यांच्यामध्ये नेहमीच चांगले  नातेसंबंध पाहायला मिळाले आहेत. ज्येष्ठ कलाकारांपासून ते अगदी नवोदित कलाकारांपर्यंत प्रत्येकासोबत करणचं मित्रत्वाचं नातं पाहायला मिळतं. पण, सध्या मात्र त्याच्या आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यात थोडे गैरसमज निर्माण झाल्याचं चित्र आहे. ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटांमध्ये करणसोबत काम करणाऱ्या बिग बींनी त्याच्या वक्तव्यावर काही गोष्टी स्पष्ट केल्या.

नुकतेच रमेश सिप्पी आणि करण जोहर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी चर्चा सुरु असताना करणने एक खुलासा केला. चित्रपटसृष्टीत उत्तर भारतीय, पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून करणने सुरुवातीला काही अंदाज बांधले होते. त्याविषयीच सांगत त्याने स्पष्ट केले, ‘सुरुवातीला मला असं वाटत होतं की, या चित्रपटसृष्टीत सर्वजण पंजाबीच आहेत. कारण, माझे बाबा सर्वांशीच पंजाबीत बोलायचे. चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमसोबतही ते पंजाबीतच बोलायचे.’ हे वक्तव्य करत त्याने अमिताभ बच्चन यांचेही उदाहरण दिले. बिग बीसुद्धा मुळचे पंजाबी नसूनही ती भाषा अगदी सराईताप्रमाणे बोलतात, असे तो म्हणाला.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

करणच्या या वक्तव्यावर बिग बींनी लगेचच ट्विट करत याविषयी काही गोष्टी ‘केजो’च्या लक्षात आणून दिल्या. ‘करण मी पंजाबी भाषा बोलतो, कारण माझी आई शीख होती. ज्यामुळे मला पंजाबी भाषा येते’, असे ट्विट त्यांनी केले. बिग बींच्या या ट्विटचा सूर ओळखत करणनेही ट्विट करून त्यांची माफी मागितली. ‘होय अमित अंकल…. मला माफ करा. माझाच गोंधळ झाला’, असं ट्विट करत त्याने या विषयाला पूर्णविराम दिला.

https://twitter.com/karanjohar/status/946636725467496448