हिंदी चित्रपटसृष्टीत काही महत्त्वाच्या बॅनर्सपैकीच एक नाव म्हणजे आरके फिल्म्स. अफलातून चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या या बॅनरचे महत्त्वाचे योगदान पाहता आता त्याअंतर्गत साकारण्यात आलेल्या २३ चित्रपटांचे जतन करण्यात येणार आहे. काही दिवसांवरच येऊ घातलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने राज कपूर यांच्या चित्रपटांच्या निगेटिव्ह पुण्याच्या आर्काइव्हकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी ‘नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया’ (NFAI)चे संचालक प्रकाश मगदूम यांनी याविषयीची माहिती दिली. ‘पुण्यातच राज कपूर यांच्या स्टुडिओअंतर्गत साकारण्यात आलेल्या २३ चित्रपटांच्या ओरिजिनल निगेटिव्ह पुण्यात जतन केल्या जातील. खुद्द ऋषी कपूर आणि रणधीर कपूरच या निगेटिव्ह फिती चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी सुपूर्द करतील’, असे ते म्हणाले.
जतन करण्यात आलेल्या या निगेटिव्हमध्ये ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘आग’, ‘बरसात’, ‘मेरा नाम जोकर’, ‘संगम’, ‘बॉबी’ या चित्रपटांचा समावेश आहे. एनएफएआयवर विश्वास ठेवत कपूर कुटुंबियांनी या अनमोल ठेव्याचे जतन करण्याची जबाबदारी आम्हाला दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे ‘एनएफएआय’तर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल
‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांच्या ओरिजिनल निगेटिव्ह ब्रिटनमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. पण, त्यांच्या मृत्यूनंतर या निगेटिव्ह भारतात आणण्यात आल्या. दरम्यान, या निगेटिव्ह ‘एनएफएआय’मध्ये ठेवण्यापूर्वी एक महिनाभरापूर्वी रणबीर कपूर त्या ठिकाणची पाहणी करुन आला. इतका महत्त्वाचा वारसा जतन करण्यासाठीच त्याने ही काळजी घेतली असल्याचे म्हटले जातेय.