दोन वेगवेगळी कथानकं एकाच चित्रपटात समांतर दाखवत जायची. दोघांचा एकमेकाशी काय संबंध आहे याबाबत प्रेक्षक विचारात पडले पाहिजेत अशी परिस्थिती निर्माण करायची. मग ती दोन कथानकं एकमेकाला आणून भिडवण्याकरता योगायोग नावाचा घटक संपूर्ण कथानकात निर्माण करावा लागतो. तसा तो आणायचादेखील. म्हणजे पहिल्या कथानकातील एखादी घटना दुसऱ्या कथानकाच्या नायकाशी आणून जोडायची. मग एकच कथानक पुढे सुरू ठेवणं शक्य होतं. त्यात तुमच्याकडे चित्रपटाची दोन-अडीच तासाची मर्यादा नसेल तर दोन कथानके एकत्रित आणायला पुरेसा वेळदेखील मिळतो. हा अगदी पठडीतला फॉम्र्यूला झाला. पण तो वापरताना त्यातील रहस्य पूर्णपणे काढून टाकून केवळ घडणाऱ्या घटनांवर प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं असेल तर मग त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्हाला माहीत असतं की खून का होताहेत, कोण करतोय तरी तुम्ही ते पाहात राहता तेव्हा त्यात दिग्दर्शकाचं यश सामावलं असतं. ‘अमेझॉन प्राइम’वर सध्या सुरू असलेल्या ‘ब्रेथ’ या वेब सीरिजबद्दल हेच म्हणता येईल. पण रहस्य नसताना आणि त्यातच पठडीतल्या काही क्लृप्त्या वापरल्यावर त्यातला थरार टिकवणं कधी कधी कठीण जातं. त्यामुळे श्वास रोखता रोखता तो सोडावा लागतो. तसं या सीरिजमध्ये होतं हे नमूद करावं लागेल.

‘अमेझॉन प्राइम’वर सुरू असणारी ‘ब्रेथ’ ही हिंदी वेब सीरिज दर शुक्रवारी एक भाग याप्रमाणे प्रदर्शित केली जात आहे. आज अखेर त्याचे सहा भाग प्रदर्शित झाले आहेत. फुप्फु साच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलाचे पालक कोणीतरी त्याला फुप्फुस दान करेल या आशेत असतात. पण त्याचा रक्तगट दुर्मीळ असल्यामुळे अनेक काळ तो प्रतीक्षा यादीतच असतो. शेवटी त्याची तब्येत गंभीर होते आणि केवळ सहा महिनेच त्याच्या हातात शिल्लक राहतात. अशा वेळी त्याच्या वडिलांना काहीही करून त्याला वाचवायचं असतं. काहीही करून मुलाला वाचवेन असं मृत्युसमयी पत्नीला दिलेलं वचन, तर दुसरीकडे अवयवदात्यांची कमतरता असते. यातून त्याचे वडील एक विचित्र निर्णय घेतात. अवयव दात्यांची हत्या करण्याचा. पहिल्या एपिसोडमध्येच वडिलांची ही भूमिका सीरिजकर्ते स्पष्ट करतात. आपल्याला पाहायचं इतकंच असतं की या हत्या कशा होतात आणि त्यासाठी पोलिसांपासून ते कसे वाचतात. कारण सीरिजच्या दुसऱ्या कथानकातील पोलीस इन्स्पेक्टरने यथावकाश मुलाच्या वडिलांच्या कथानकात प्रवेश केलेला असतो.

या वेबसीरिजचं वैशिष्टय़ हेच आहे की त्यात रहस्य असं काहीही नाही. नायकाची भूमिका पहिल्या दोन एपिसोडमध्येच स्पष्ट झालेली आहे. काय होणार याची प्रेक्षकांना साधारणपणे कल्पना आलेली आहे. मग हे सारं आपण का पाहात राहतो, हा प्रश्न उरतोच. त्याचं उत्तर त्या सीरिजच्या दिग्दर्शनात दडलं आहे. म्हटलं तर टिपिकल बाज, पण दुसरीकडे प्रेक्षकांच्या डोक्याचा भुंगा काही संपलेला नसतो. पण उत्कंठा राहतेच. त्यातच ‘अमेझॉन’ आठवडय़ाला एकच भाग प्रसारित करत असल्यामुळे पुढे काय ही उत्कंठा टिकून राहते. पण त्यातील थरार तेवढय़ाच उत्फु ल्लतेने येत नाही. तो मर्यादित राहतो, हे मात्र निश्चित.

संगीत, संवाद, चित्रीकरण, संकलन या पातळ्यांवर फार काही ग्रेट म्हणता येईल असं काही यात नाही. आर. माधवन (मुलाचे वडील) या अभिनेत्याच्या वलयामुळे अनेकांच्या चर्चेत ही वेबसीरिज असली तरी त्याच्या अभिनयाचं काही विशेष दर्शन यात होतं असं देखील म्हणता येणार नाही. त्यामुळे सारं कौशल्य आहे ते कथानकाच्या मांडणीत. वर म्हटल्याप्रमाणे नायक काही हत्या करणार आहे हे प्रेक्षकांना आधीच स्पष्ट  झालेलं असतं. मग अशा वेळी तो प्रसंग कसा थरारक करता येईल यावरच अधिक प्रयत्न घ्यावे लागतात. अर्थात आजतरी सहाच भाग झाल्यामुळे सारा थरार हा हत्यांवरच केंद्रित होत आहे. पुढे कथानकात अन्य काही रहस्य दडलं असेल तर त्यावर सध्यातरी भाष्य करता येत नाही.

त्यामुळे या वेबसीरिजची उजवी बाजू कोणती तर हा थरार टिकवणं हीच आहे. पण त्याचबरोबर काही इतर प्रसंग रुचीपालटासारखे अधेमधे येत राहतात आणि श्वास पूर्णपणे रोखून धरता येत नाही. हल्ली अशा प्रकारच्या कथानकांत गूगलद्वारे इंटरनेटवरील तज्ज्ञ माहितीचा संदर्भ वापरण्याची जी एक पद्धत रूढ झाली आहे, तीच यातही वापरली आहे. पण एरव्ही सीसीटीव्हीसारखा प्रकार जो मुंबईत (कथानक मुंबईतच घडतं) तरी वापरण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. किंबहुना गेल्या एक-दोन वर्षांतील काही चित्रपटांत तर त्याचा अगदी प्रभावी उपयोग दिसतो. आणि हल्ली तर एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना हे चित्रीकरण मिळण्यापूर्वीच ते वृत्तवाहिन्या किंवा समाजमाध्यमांवर फिरत असतं. पण या वेबसीरिजमध्ये असे प्रश्न सध्यातरी पूर्णत: दुर्लक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रेक्षकाला अशाप्रसंगी जे प्रश्न पडतात ते पूर्णत: बाजूलाच ठेवावे लागतात.

तरीदेखील एक वेगळा प्रयोग म्हणून हे दर आठवडय़ाचे उत्कंठा टिकवणारे भाग पाहायला हरकत नाही. दर आठवडय़ाला एकच भाग पाहायला मिळणार असल्यामुळे रहस्य नसलं तरी त्यातील थरार तुम्हाला आकर्षित करतो हे नक्कीच.

– सुहास जोशी

suhas.joshi@expressindia.com