‘जंगल ना गाणं कधी ऐकलय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर नुकताच लाँच करण्यात आला. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती आता या टीजरमुळे आणखी वाढली आहे.

वाचा : कपिलच्या जंजीर कुत्र्याचा मृत्यू

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. या टीजरमधून ‘राक्षस’ ही आदिवासी आणि जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. ‘जंगल गाणं गातं, ते हसतं – रडतं त्याला भावना असतात’ असे यात म्हटले आहे. तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय ‘आई, बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय’. या संवादामुळे गूढ वाढलेल्या ‘राक्षस’मध्ये नक्की काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.

वाचा : सचिनने न ओळखल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता नाराज

‘राक्षस’ चित्रपटात शरद केळकर, साई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत. घनदाट, किर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहे? आणि या ‘राक्षस’मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.