बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान आणि गायक मिका सिंग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. सलमानच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने मिकाच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा चालणार आहे. कारण यामधील ‘पार्टी चले ऑन’ हे गाणं मिकाच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. सलमान आणि मिका ही जोडी याआधाही बऱ्याच सुपरहिट गाण्यांसाठी पाहिली गेली. मिकाच्या आवाजातील गाणं सलमानसाठी नेहमीच हिट ठरतं असं म्हणायला हरकत नाही.

‘रेडी’मधील ढिंका- चिका, ‘बॉडीगार्ड’मधील देसी बीट, ‘किक’मधील जुम्मे की रात आणि ‘बजरंगी भाईजान’मधील आज की पार्टी यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा ‘रेस ३’मधल्या पार्टी चले ऑन या गाण्याच्या निमित्ताने सलमान आणि मिका चाहत्यांना थिरकण्यास भाग पाडणार आहेत.

वाचा : स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्टी साँगमध्ये चित्रपटातील सर्व कलाकार एका क्लबमध्ये  ठेका धरताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात सलमानची कथित प्रेयसी लूलिया वंतूरनेही मिकाला साथ दिली आहे. अॅक्शन आणि थरारने परिपूर्ण अशा ‘रेस ३’ची शूटिंग थायलंड, अबू धाबी आणि मुंबईत पूर्ण झाली. सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसचे रेकॉर्ड तोडू शकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेझी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्याही भूमिका आहेत.