सध्या संपूर्ण जगावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक देश त्यांना शक्य होईल त्यानुसार या विषाणूवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच देशांमध्ये शाळा, महाविद्यालये, मॉल्स, कॅफे, चित्रपटगृह यासारखी गर्दीची ठिकाणं बंद केली आहेत. तसंच काही देशांनी त्यांची उड्डाणेदेखील रद्द केली आहेत. अलिकडेच अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा भारतात परतले आहेत. मात्र या गंभीर परिस्थितीमध्ये अभिनेत्री राधिका आपटे चक्क लंडनला गेली आहे. विशेष म्हणजे पतीच्या काळजीपोटी राधिकाने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
राधिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लंडनला सुखरुप पोहोचल्याचं सांगितलं आहे. “अनेक जण मेसेज करुन माझ्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. त्यामुळे मी माझ्या शुभचिंतकांना सांगू इच्छिते की, मी व्यवस्थित लंडनला पोहोचले आहे. मला इमिग्रेशन करतानादेखील कोणतीही समस्या आली नाही. त्या भागात जास्त गर्दीदेखील नव्हती.विशेष म्हणजे लंडन त्यांची वाहतूक व्यवस्था नेमकी कधी बंद करण्यात येणार आहे हे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनाही ठावूक नव्हतं”, असं राधिकाने सांगितलं.
त्यातच सध्या जगभरात करोना विषाणूचं सावट आहे. त्यातच राधिकाचा पती टेलर लंडनमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच्यासोबत रहावं यासाठी राधिका लंडनला गेली आहे.
वाचा : Coronavirus : ‘पाकिस्तानीही आम्हाला प्रिय’; ऋषी कपूरचं इम्रान खानना आवाहन
दरम्यान, राधिकाने २०१२ मध्ये टेलरसोबत लग्न केलं असून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. राधिका बऱ्याच वेळा व्यस्त कामकाजातून वेळ काढून टेलरला भेटायला जात असते.