लग्नसोहळा म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभी राहते ती नटलेली नवरी. हिच नवरी लग्नात नटण्यासाठी कित्येक महिने आधीपासून तयार करण्यास सुरुवात करते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात लग्न हे फार महत्त्वाचे क्षण आहेत. त्यामुळे लग्नात परिधान करण्याचे कपडे त्यावर शोभून दिसतील असे दागिने, मेकअप या सर्व गोष्टींकडे मुलींचा सर्वात जास्त कल असतो आणि या सर्वाच्या खर्चासाठी मुली मागेपुढेही पाहत नाहीत. त्यात बॉलिवूड अभिनेत्रींची लग्न म्हटली एक वेगळाच थाट असतो.

गेल्याच वर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नसोहळ्याने डोळे दीपवून टाकले होते. तसेच या अभिनेत्रींनी लग्नसोहळ्यात परिधान केलेल्या लाखो रुपयांच्या कपड्यांच्या तर काही वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्वाला अपवाद म्हणजे अभिनेत्री राधिका आपटे. राधिकाने तिच्या लग्नात स्वत:च्या आजीची साडी नेसली होती. राधिकाने हे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी राधिकाने फेमिना या मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये राधिकाने तिच्या लग्नात आजीची जुनी फाटलेली साडी नेसल्याच्या खुलासा केला. राधिकाने कोर्ट मॅरेज केले. त्यावेळी तिने आजीची जूनी आणि ठिकठिकाणी फाटलेली साडी नेसली होती. ‘मी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. मी लग्नात माझ्या आजीची ठिकठिकाणी फाटलेली आणि एकदम जूनी साडी नेसली होती. कारण या जगातील माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी आजी ही एक आहे’ असे राधिका म्हणाली.

‘फॅन्सी कपड्यांवर पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तींपैकी मी नाही. मी लग्नाच्या पार्टीसाठी एक नवा ड्रेस घेतला होता आणि त्याची किंमत दहा हजाराहून कमी होती’ असे राधिका पुढे म्हणाली