आगामी ‘पॅडमॅन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात लवकरच झळकणारी अभिनेत्री राधिका आपटे सध्या आणखी एका कारणामुळे ट्रेण्डमध्ये आली आहे. ब्रिटिश – भारतीय अभिनेता असलेल्या देव पटेलसोबत राधिका चित्रपटात काम करणार आहे, त्यामुळेच ही हरहुन्नरी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘स्लमडॉग मिलिनेयर’ आणि ‘लायन’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी देव नावाजला जातो. या वृत्ताला राधिकाने नुकताच दुजोरा दिला.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली की, ‘होय, मी देवसोबत चित्रपट करत असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल.’ ‘डेक्कन क्रोनिकल’च्या वृत्तानुसार, या चित्रपटाची कथा काहीशी वेगळी असणार आहे. चित्रपटाची कथा हटके असून, त्यासाठी राधिकाला विचारण्यात आले. हिंदी, इंग्रजी भाषिक असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांत सुरुवात होईल, असे सुत्रांनी म्हटले आहे.

वाचा : ..म्हणून ‘बिग बॉस ११’च्या किताबापासून दुरावू शकते शिल्पा शिंदे

‘पॅडमॅन’मध्ये राधिका अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणारे अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. आर बल्की दिग्दर्शित या चित्रपटाविषयी राधिका म्हणाली की, एका छोट्याशा गावातील हे कथानक असल्यामुळे मला त्यांच्या पद्धतीची साडी नेसावी लागत होती. तसेच, विशिष्ट प्रकारे केस बांधावे लागत होते. त्यांची भाषा शिकण्यासाठी मी स्वानंद किरकिरे (गीतकार, पार्श्वगायक) यांच्याकडून धडे घेतले. ते इंदोरचे असून चित्रपटाचे सहलेखकदेखील आहेत.

वाचा : तेजस्विनी पंडितची अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिका ‘पॅडमॅन’नंतर सैफ अली खान, चित्रांगदा सिंह आणि नवकलाकार रोहन मेहरा यांच्यासोबत ‘बझार’ चित्रपटात दिसेल. नुकतेच तिने अनुराग कश्यपच्या ‘लव्ह अॅण्ड लस्ट’ लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. तसेच, ती आयुषमान खुरानासोबत श्रीराम राघवनच्या पुढील चित्रपटातही काम करत आहे.