‘कोई धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता’ पासून ते ‘बॅटरी नही बोलनेका..’. हे डायलॉग गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. एकापेक्षा एक सरस डायलॉग आणि चित्रपटाच्या प्रत्येक ट्रेलरमध्ये शाहरुखचा एक वेगळा अंदाज आणि त्याचे ‘रईस’पण दाखविण्यामध्ये दिग्दर्शकाने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाहीये. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या २५ वर्षांपासून शाहरुख खान हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांमध्ये असणारे उत्साही वातावरणामागे शाहरुख खान हे या नावाच्या प्रस्थाचेही एक कारण आहे हे नाकारता येणार नाही. अशा या ‘रईस’ अभिनेत्याच्या या चित्रपटामध्ये दिग्दर्शक राहुल ढोलकियाने एक वेगळे जग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

अवैध दारुचा व्यवसाय, हतबलता, परिस्थिती, स्थानिक राजकारण आणि प्रसंगी साथ देणारे, विरोधात जाणारे काही चेहरे या सर्वांसोबत ‘रईस’ कसा जोडला गेला आहे यावर चित्रपटातून राहुल ढोलकियाने नजर टाकली आहे. रईसच्या बालपणपापासून सुरु होणाऱ्या या प्रवासामध्ये गुजरातची एक वेगळीच दाहक बाजू दाखवली आहे. देशी दारूपासून सुरु झालेला हा प्रवास इंग्लिश दारुच्या व्यवसायापर्यंत कसा पोहोचतो आणि मग त्यातूनच रईस कसा घडतो याचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शाहरुख खान असला तरीही इतर सर्वच कलाकार त्यांच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. अगदी शाहरुखच्या बालपणाची भूमिका साकारणाऱ्या त्या बालकलाकारापासून सर्वच कलाकार या यादीत येतात. शाहरुख खानने साकारलेल्या रईसविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये तो वयाच्या विविध टप्प्यांवर दिसत आहे.

tula shikvin changalach dhada marathi serial saaniya chaudhari will enters in the show
अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला
Pune video
Pune : जुन्या पुणे शहरातील काही दुर्मिळ छायाचित्रे! VIDEO होतोय व्हायरल
chala hawa yeu dya fame bharat ganeshpure entry in zee marathi shiva serial
‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो
shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

एक अभिनेता म्हणून शाहरुखने त्याच्या या चित्रपटामध्ये बरीच मेहनत घेत रईस पडद्यावर रंगवला आहे. त्याच्या शत्रूंना मारझोड करण्यापासून ते त्यांच्याच नाकावर टिचून मनमर्जी करणारा आणि सर्वसामान्यांच्या नजरेत ‘मसीहा’ बनलेला किंग खान प्रेक्षकांना भावतोही. पण, बालपणापासूनच डोळ्यावर ‘बॅटरी’ म्हणजेच चष्मा घालणाऱ्या रईसला काही दृश्यांमध्ये अगदी लांबच्या गोष्टी, माणसेही अचूक दिसतात त्यामुळे रईसची ही नजर काहीशी खटकते खरी. पट्टीच्या कलाकारांची निवड या चित्रपटाची जमेची बाजू आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पाहताना एक कर्तव्यदक्ष, जबाबदारीस तत्पर, चुकिच्या मार्गावर जाणाऱ्यांच्या वाकड्यात शिरणारा आणि दिलेल्या शब्दाला जागणारा एक अधिकारी सर्वांचीच मनं जिंकतो. नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचा एक वेगळाच बाज आहे. त्यामुळे रईस आणि त्याच्यामध्ये उडणारे खटके या चित्रपटातील महत्त्वाचा भाग आहे. एक सर्वसामान्य दारु माफिया, त्याचा प्रवास, राजकारण आणि विश्वासघात असे कथानक या चित्रपटात साकारलेले आहे. गुजरातमधील दारु माफिया अब्दुल लतिफ आणि १९९३ मुंबई स्फोटांमध्ये त्याचा सहभाग अशा एकंदर घटनेवर हा चित्रपट आधारल्याची चर्चा होती. पण, चित्रपटाशी संलग्न व्यक्तींनी मात्र या चर्चा नाकारल्या होत्या. असे असले तरीही आतापर्यंत वाचण्यात आणि ऐकण्या-बोलण्यात जितकी माहिती मिळाली त्याचीच झलक या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे.

शाहरुखने साकारलेल्या रईसला त्याच्या धंद्यात पाय रोवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील परफेक्शनिस्ट अभिनेता अतुल कुलकर्णीही दिसत आहे. अतुल कुलकर्णीचीही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. अतुल कुलकर्णी, उदय टिकेकर, मोहम्मद झिशान आयुब, शिबा चड्ढा यांच्या भूमिकाही अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. चित्रपटातील अभिनेत्रीविषयी म्हणायचं झालं तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या चित्रपटात आसियाच्या भूमिकेत दिसत आहे. रईसवर अतोनात प्रेम करणारी, त्याच्या चुकिच्या पावलावर सावध करणारी आणि कठिण प्रसंगी त्याची ताकद बनणारी, त्याला साथ देणारी माहिरा, तिची भाषा आणि एकंदर शाहरुख सोबतचा तिचा वावर पाहण्याजोगा आहे. माहिराच्या रुपात एक वेगळी अभिनेत्री शाहरुखसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसत आहे. चित्रपट अर्थातच गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा असल्यामुळे हाणामारी, रक्तपात, डायलॉगबाजी पाहायला मिळत आहे. पण काही दृश्यांमध्ये हे सर्वकाही अंगावर येत आहे असे वाटते.

चित्रपटातील गाणी, नृत्य, पार्श्वसंगीत, चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेले फतेहपूर, आणि एकंदर संपूर्ण सेट यावर दिग्दर्शकांनी चांगलीच मेहनत घेत बारकावे टिपण्याचाही प्रयत्न केला आहे. राहुल ढोलकिया याचे याआधीचे चित्रपट पाहता रईसमधूनही त्याने एक प्रकारचे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, हा प्रयत्न रंगवत असताना, रईसला सामान्यांचा मसीहा दाखवत असताना कुठेतरी चित्रपटाचा उत्तरार्ध उगाचच जास्त वेळखाऊ वाटू लागतो. त्यामध्ये पुन्हा हे असं याआधीही पाहिलंय ही पुसटशी कल्पनाही येते. या सर्वांमध्ये शाहरुखची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे असेच म्हणावे लागेल. किंग खान त्याच्या डोळ्यातील भावभावनांच्या अभिनयाने अनेकांचीच मन जिंकण्याच कारण शाहरुख या चित्रपटातही त्याच्या अभियातून सिद्ध करत आहे. शाहरुख, नवाझूद्दीन आणि अतुल कुलकर्णी या त्रिकुटाच्या दमदार अभिनयाच्या जुगलबंदीमुळे बॉक्स ऑफीसवरही हा चित्रपट ‘रईस’ ठरेल हे निश्चित.

  • दिग्दर्शक- राहुल ढोलकिया
  • निर्माते- गौरी खान, फरहान अख्तर, रितेश सिधवानी
  • कलाकार- शाहरुख खान, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब, नवाझुद्दीन सिद्दीकी, अतुल कुलकर्णी आणि सहकलाकार

 

-सायली पाटील
ट्विटर- @sayalipatil910
sayali.patil@indianexpress.com

nawazuddin-620x400