बॉलीवूड अभिनेत्री असिनचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सध्या यथातथाच सुरू असला तरी वैयक्तिक जीवनात असिन सातवे आसमाँपर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असीन लवकरच मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक असणाऱ्या राहुल शर्मा यांच्याशी विवाहबद्ध होणार असल्याचे एव्हाना सगळ्यांनाच माहीत झाले आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीमुळे असीन चांगलीच चर्चेत आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साधारण वर्षभरापूर्वी राहुल शर्मा यांनी असीनला प्रपोज केले होते. त्यावेळी राहुलने असीनला चक्क ६ कोटींची अंगठी भेट दिल्याचे समजत आहे. ६ कॅरेटची ही सॉलेटियर अंगठी खास बेल्जियमहून मागविण्यात आली होती. या अंगठीला लावण्यात आलेल्या हि-यांमध्ये या दोघांच्या नावातील आद्याक्षरांचा AR (असीनचे A आणि राहुलचे R) मोनोग्राम आहे. इतकेच नव्हे तर, या अंगठीच्या आत राहुल यांनी असिनसाठी एक खास संदेशही कोरून घेतला आहे. असिनने काही दिवसांपूर्वीच आपल्या नात्याबद्दल जाहीर वाच्यता केली होती. त्यानंतर असिनने एका मल्याळम नियतकालिकासाठी राहुलसोबत फोटोशूटसुद्धा केले होते. त्यावेळी काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये राहुल यांनी असिनला दिलेली खास अंगठी दाखवताना दिसत आहे. दरम्यान, असिनने लग्नानंतर काही काळ चित्रपटांपासून लांब राहणार असल्याचेही सांगितले होते.