बी-टाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात काही चर्चा ऐकायला मिळत आहेत. २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनय क्षेत्रात तो विशेष कामगिरी करु शकला नाही. प्रतीक आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याला भेटलेली ‘परफेक्ट पार्टनर’. २७ वर्षीय सान्या सागरला तो डेट करत असल्याची चर्चा आहे. लखनऊमध्ये राहणारी सान्या एका राजकीय नेत्याची मुलगी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
सान्या आणि प्रतीक गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांचे कुटुंबीयही एकमेकांना भेटले आहेत. सान्याने लंडन फिल्म अकॅडमीतून चित्रपट निर्मितीमध्ये पदवी घेतली असून ‘द लास्ट फोटोग्राफ’ या चित्रपटासाठी तिने प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून काम केलंय. याशिवाय, ‘इलेवन्थ अवर’ या लघुपटाच्या निर्मितीचंही काम तिने पाहिलंय.
https://www.instagram.com/p/BYxaVwZlgO9/
प्रतीक आणि सान्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जरी राजकारणाची असली तरी चित्रपटांसाठी असलेली आवड या दोघांना एकत्र घेऊन आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. प्रतीकच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘बागी २’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यानंतर अनुभव सिन्हा यांच्या ‘मुल्क’ या चित्रपटातही तो भूमिका साकारणार आहे.