बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येत राज कुंद्रा प्रकरणाविषयी खळबळजनक खुलासे केले आहेत. यातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिला राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाउसमधून ऑफर आली असल्याचा गौप्यस्फोट केलाय.

मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केलाय. राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाउसमधून फोटो आणि व्हिडीओची मागणी करण्यात आल्याचं मनिषा या मुलाखतीत म्हणालीय. ती म्हणाली, “राज कुंद्राचं प्रोडक्शन हाउस असल्याने मला वाटलं नावाजलेलं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे मी त्यांना भेटले. यावेळी त्यांनी माझ्याकडे काही फोटोंची मागणी केली तसचं काही व्हिडीओ शूट करणार असल्याचं ते म्हणाले.” मात्र यावर मनिषाने राजच्या सहकाऱ्यांना काही प्रश्न विचारल्याचं ती म्हणाली. या फोटोशूटची आणि व्हिडीओची काही कथा किंवा थीम आहे का? असा सवाल मनिषाने विचारला होता. मात्र यावर तिला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने ऑफर नाकारल्याचं तिने सांगितलं. फक्त एखाद्या वेब साईडवर आपले फोटो आणि व्हिडीओ टाकले जाणार या कल्पनेने मनिषाला विचार करायला भाग पाडलं आणि तिने थेट नकार दिला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अडकण्यापासून मनिषा वाचली.

हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट

या संपूर्ण प्रकरणात काही तरी गोंधळ असल्याचा अंदाज मनिषाला आधीच आला होता. यासाठी तिने वेळीच ऑफर नाकारत थोडा शोध घेतला. ज्या नंबरवरून मनिषाला कॉल आला होता त्या मोबाईल नंबरचा तपास केला असता तो नंबर नायजेरियाचा असल्याचं लक्षात आल्याचं मनिषाने या मुलाखतीत सांगितलं. अशा प्रकरणांपासून दूर राहण्यासाठी आपण काही गोष्टींची दखल घेणं आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचंदेखील ती म्हणाली, “आपला मोबाईल कुणाला देऊ नका, पासवर्ड कुणाला देऊ नका.कारण काहीही होवू शकतं .” असं म्हणत मनिषाने आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे.

‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘चंद्रकोर’,’भोळा शंकर’ या मराठी सिनेमांमध्ये मनिषा झळकली आहे. तसंच ‘बंदूक’, ‘लॉटरी’ या हिंदी सिनेमांमध्ये देखीलल तिने काम केलंय.