बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधून काही अश्लील चित्रफिती हाती लागल्या आहेत. लंडनमधली केनरीन कंपनी महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये ब्रेक देऊ, असं आमिष दाखवून त्यांना न्यूड सीन करायला लावायचे. त्या क्लिप्स काही अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सना विकल्या जात होत्या. या केनरीन कंपनीचं अकाऊंटिंग आणि कंटेण्ट तयार करण्याचं काम राज कुंद्राच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधूनच होत असे. या प्रकरणात हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला अटक करण्यात आली. आता याप्रकरणी लवकरच राजची बायको आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा भागीदार आहे. त्यामूळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का? यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘शिल्पा योग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये राज कुंद्रा हा डायरेक्टर असल्याचं दाखवण्यात आलंय. परंतु पोलिसांच्या तपासात तो या कंपनीचा डायरेक्टर नसल्याचं उघड झालंय. त्याचप्रमाणे राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. यात ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीत सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येतेय.

ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील क्लिप विकण्याचा प्रकार सुरू होता, अशाच प्रकारचा आणखी एक अ‍ॅप ‘जेएल ५०’ याचं सोशल मीडिया ब्रॅण्डींग देखील अभिनेत्री शिल्ला शेट्टीनं केलं होतं. त्यामूळे राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्ला शेट्टीला सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी अगदी बारकाईने आपला तपास सुरू केला असून अद्याप शिल्पा शेट्टीविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सध्या तरी या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले. अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. क्राइम ब्रांचची टीम त्याला भायखळा तुरुंगात नेत असताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली होती.