ऐतिहासिक चित्रपट ही कायम पर्वणी असते, पण त्यातही युद्धपट पाहायला मिळणे ही मोठी अवघड गोष्ट. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शनात हातोटी असलेल्या आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत – द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
गोवारीकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर राज ठाकरेंना आवडला असून ट्विट करत त्यांनी ट्रेलरची प्रशंसा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे.” या ट्रेलरसोबतच चित्रपटदेखील पाहण्याचे आवाहन राज यांनी या ट्विटद्वारे केले आहे.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण चित्रपट देखील नक्की पहा https://t.co/UOjrNjiH3L
— Raj Thackeray (@RajThackeray) November 10, 2019
अटकेपार पोहोचलेल्या मराठय़ांनी लढलेल्या सर्वात मोठय़ा लढाईची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार असल्याने एकीकडे या चित्रपटाबद्दल उत्सुकताही आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात सदाशिवराव भाऊंच्या व्यक्तिरेखेला अर्जुन कपूर किती न्याय देऊ शकेल, यावरून समाजमाध्यमांवर चर्चेलाही उधाण आले आहे. यामध्ये अर्जुनसोबतच संजय दत्त व क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय दत्त यात अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे.