आपला ७५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन मालदीवला गेले आहेत. मालदीवमधील सेलिब्रेशनचे नियोजन अभिषेक आणि ऐश्वर्याने मिळून केले. सात दिवस बच्चन कुटुंब तेथे सुट्ट्यांचा आनंद घेणार आहेत. बॉलिवूडच्या या महानायकावर आज शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीसोबतच इतरही क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बींसाठी राज ठाकरेंनी फेसबुकवर एक भलीमोठी पोस्टच लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं. इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत.’

या पोस्टमध्ये त्यांनी अमिताभ यांच्यासोबत झालेल्या वादाचा उल्लेख करत मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, आजही नाही, असे त्यांनी लिहिले. या पोस्टसोबतच त्यांनी बिग बींचे सहा विविध कार्टून रेखाटले. १९७० पासून ते २०१७ पर्यंतची बिग बींची विविध रुपे या कार्टूनमध्ये पाहायला मिळतात.