करोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्वकाही ठप्प झाले होते. पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाइजेशन करण्यात आले.
‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिले आणि आता लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री शुभांगी गोखले, शिवानी सोनार, मनीराज पवार, श्रुती अत्रे, गार्गी फुले आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
मालिकेतील कलाकार दिवसातील जास्तीत जास्त वेळ सेटवरच असतात आणि म्हणूनच सेट म्हणजे कलाकारांसाठी जणू दुसरं घरच असतं. त्यामुळे सेटवरील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मंडळी तीन महिन्यानंतर झालेल्या भेटीनंतर थोडे भावूक झाले. आवश्यक तितक्याच क्रू मेंबर्सच्या उपस्थिती चित्रीकरण पार पडणार आहे.
“इतक्या दिवसानंतर कॉल टाईमचा मेसेज बघून मला खूप आनंद झाला. मी स्वत: खूप उत्सुक आहे. आम्हाला खात्री आहे प्रेक्षकांचे प्रेम असेच कायम राहील”, अशी प्रतिक्रिया शिवानी सोनारने दिली आहे. २१ जुलैपासून संध्याकाळी सात वाजता मालिकेचे नवीन एपिसोड सुरू होणार आहेत.