दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘२.०’चे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती. दि. २६ जानेवारीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील निर्माते नाराज झाले आहेत. उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेत त्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखा एप्रिलसाठी राखून ठेवल्या होत्या. पण आता एप्रिलमध्ये ‘२.०’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हटल्यावर त्यांना धडकीच भरली आहे. तर दुसरीकडे व्हीएफएक्सचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्याने ‘२.०’ चित्रपट निर्माते संबंधित हॉलिवूड स्टुडिओवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध हॉलिवूड स्टुडिओने चित्रपटातील व्हीएफएक्सचं काम दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्याने निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. यातील संपूर्ण व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्सचं काम अमेरिकन कंपन्यांना देण्यात आलं होतं. अमेरिकेच्या १० कंपन्यांना १००० शॉट्स दिले गेले होते. प्रत्येक कंपनीला १०० शॉट्स यानुसार विभागणी करण्यात आली होती. हे काम पूर्ण न केल्याने आता याविरोधात निर्माते कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत.

वाचा : कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, अशाप्रकारे राजामौलींनी जपलं यामागचं रहस्य

इतकंच नव्हे तर या कंपन्यांना प्रोजेक्टच्या ९० टक्के पैसा देण्यात आला असून त्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्याची माहिती समोर येत आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आली आहे. याआधी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण हे मुहूर्त हुकले आणि २६ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता एप्रिलमध्ये ‘२.०’ प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.