भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ‘2.0’ आज (गुरुवारी) प्रदर्शित झाला आणि पहिल्या शोपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचली. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर नवे विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे यात काही शंका नाही आणि त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे. ‘बुक माय शो’वर या चित्रपटाचे दहा लाखांहून अधिक तिकिट बुक झाल्याची माहिती समोर येत आहे.

‘2.0’च्या तिकिट विक्रीचा हा आकडा ‘मार्व्हल्स अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ आणि ‘बाहुबली: द बिगनिंग’ यांच्यापेक्षाही जास्त असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाईसुद्धा धमाकेदार होणार यात काही शंका नाही. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने पहिल्या दिवशी ५० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. तर ‘2.0’ पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटी कमावण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास हा भारतीय चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड ठरेल.

वाचा : 2.0 ची पायरसी रोखण्यासाठी १२ हजार वेबसाईट्स ब्लॉक

‘2.0’च्या ट्रेलरनेही पहिल्याच दिवशी विक्रम केला होता. अवघ्या २४ तासांत डिजीटल प्लॅटफॉर्मवर या ट्रेलरला तब्बल २ कोटी ५० लाख व्ह्यूज मिळाले होते. या चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन यांची भूमिका असलेल्या ‘2.0’चे दिग्दर्शन शंकरने केलं आहे.