सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘काला’ हा चित्रपट उद्या (गुरुवार) प्रदर्शित होत आहे. मात्र, कर्नाटकात याच्या प्रदर्शनाला अजूनही विरोध होत आहे. अखेर रजनीकांत यांनी स्वत: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांच्याकडे विनंती केली आहे. ज्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल तिथे सुरक्षा पुरवण्याची विनंती त्यांनी केली आहे. कावेरी पाणीवाटपाच्या प्रश्नावरून रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच ‘काला’ चित्रपटाला विरोध होत आहे.

कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. तर चित्रपटगृह मालकांच्या इच्छेनुसार त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करावा असे आदेश कोर्टाकडून मंगळवारी देण्यात आले. त्याचप्रमाणे अशा चित्रपटगृहांबाहेर सुरक्षा बंदोबस्त पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल हेसुद्धा कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाच्या आदेशांचं पालन करणार असल्याचं सांगतानाच ही वेळ चित्रपट प्रदर्शनासाठी योग्य नाही अशी टिप्पणी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे. म्हणूनच रजनीकांत यांनी त्यांना विनंती केली आहे.
‘मी कुमारस्वामी यांची मनस्थिती समजू शकतो. पण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होत असतानाच कर्नाटकमध्ये बंदी घातल्यास तो (कावेरी पाणीवाटप) मुद्दा आणखीनच अधोरेखित होईल. कालावर बंदी घालण्याची फिल्म चेंबर्सची मागणी अयोग्य आहे. त्यांनी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करावा,’ असं रजनीकांत म्हणाले.

का आहे विरोध?

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून जबरदस्त संघर्ष सुरू आहे. कन्नड अस्मितेचा मुद्दा लावून धरणाऱ्या संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. रजनीकांत यांनी कावेरी नदीतून तामिळनाडूला जास्तीचं पाणी मिळावं अशी मागणी केली होती. या मागणीमुळेच या चित्रपटाला विरोध करण्याचं कर्नाटकातील काही संघटनांनी ठरवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी कावेरीच्या पाणीवाटपासंदर्भात आदेश दिला होता. या आदेशामुळे तामिळनाडू ऐवजी कर्नाटकाला जास्त पाणी मिळालं आहे. याचा निषेध करण्यासाठी रजनीकांत आणि कमल हसन या दक्षिणेतील दिग्गज कलाकारांनी आंदोलन देखील केलं होतं.