शेक्सपिअरच्या शोकांतिका रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना नावाजले जाते. शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’, ‘ओथेल्लो’, ‘हॅम्लेट’ यावर भारद्वाज यांनी ‘मकबूल’, ‘ओमकारा’ आणि ‘हैदर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांना समीक्षकांचीही पसंती मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा शेक्सपिअरच्या शोकांतिकेवर चौथा चित्रपट आणण्याचा विचार केला तर ‘किंग लिअर’च्या भूमिकेसाठी रजनीकांत यांनाच आपली पहिली पसंती असेल, असे विशाल यांचे म्हणणे आहे.

वाचा : वडिलांच्या मित्रांनी फेकलेली सिगारेट ओढायचा संजय दत्त

‘हैदर’च्या चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी मी ‘किंग लिअर’च्या कथेवर काम करत होतो. त्यावेळी माझ्या समोर या भूमिकेसाठी सर्वप्रथम रजनीकांत यांचाच चेहरा समोर आला. त्यामुळे शेक्सपिअरच्या शोकांतिकेवर मी चौथा चित्रपट काढल्यास माझी पहिली पसंती रजनीकांत यांनाच असेल, असे ब्रम्हपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टीव्हलमध्ये भारद्वाज यांनी म्हटले. आपल्या खास चित्रपटांसाठी शेक्सपिअरच्या शोकांतिकांचीच निवड का केली, असा सवाल केला असता ते म्हणाले, ”मकबूल’ चित्रपट हा अपघात होता आणि पुढचे दोन चित्रपट हे तीन शोकांतिकांची मालिका पूर्ण करण्यासाठी करण्यात आले. ‘ओथेल्लो’वर आधारित असलेला ‘ओमकारा’ चित्रपट करताना माझ्यावर या त्रयींपैकी असलेला तिसरा चित्रपट आणण्याचा दबाव आला. या मालिकेतील तिसरा चित्रपट ‘हैदर’ माझ्यासाठी खूप कठीण होता. आपला तिसरा चित्रपट पहिल्या दोन चित्रपटांच्या तोडीचा असावा आणि त्याचवेळी यात काश्मीरमधील संघर्षाची पार्श्वभूमी दाखवण्याचाही दबाव माझ्यावर होता.

वाचा : ‘होय, माझं त्याच्यावर क्रश होतं’

‘मकडी’ चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’चे दिग्दर्शन करणाऱ्या या दिग्दर्शकाने लहान मुलांसाठी फार कमी प्रमाणात चित्रपटांची निर्मिती होते, असे म्हणत आपली खंत व्यक्त केली. ‘लहान मुलांसाठी चित्रपट करण्यासाठी हातावर मोजण्याइतपत लोक तयार असतात. ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे मुलांसाठी करण्यात आलेले चित्रपट व्यावसायिक पटलावर कुठेच दिसत नाही. हे संपूर्ण चित्र बदलायले हवे. या समाजाचा भाग म्हणून मुलांसाठी अशा चित्रपटांची निर्मिती करायला हवी जे त्यांना चित्रपटगृहात जाऊन बघता येतील’, असे भारद्वाज म्हणाले.