सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘काला’ Kaala हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ७ जून रोजी जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्यापूर्वीच ‘काला’ने तब्बल २३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. धक्का बसला ना तुम्हाला? प्रदर्शनापूर्वीच इतकी मोठी कमाई कशी? तर सिनेप्रक्षेपणाचे आणि म्युझिक राइट्स विकून ‘काला’ने सुमारे २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.
कर्नाटक राज्याची कमाई यात समाविष्ट करण्यात आली नाही कारण तिथे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. कर्नाटक सोडता तामिळनाडूमध्ये ७० कोटी रुपये, आंध्रप्रदेश आणि निजाममध्ये ३३ कोटी रुपये, केरळात १० तर उर्वरीत देशात ७ कोटी रुपयांसाठी हे राइट्स विकले गेले. तर देशाबाहेर ४५ कोटी रुपयांना प्रक्षेपण राइट्स विकण्यात आले. अशाप्रकारे कर्नाटक वगळता एकूण १५५ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय म्युझिक राइट्सचे ७५ कोटी रुपये असल्याने एकूण कमाई सुमारे २३० कोटी रुपये इतकी झाली.
Narendra Modi biopic: मोदी नव्हे तर परेश रावल देणार ‘मित्रोsss’ची हाक
जर कर्नाटकमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तर सुमारे ३०० कोटी रुपयांपर्यंत ही कमाई जाऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे असं म्हणायला हरकत नाही. रजनीकांत यांची दाक्षिणात्य राज्यांमधली क्रेझ तर साऱ्यांनाच माहित आहे. पा रंजीत दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती धनुषने केली आहे. सिनेमात रजनीकांत यांची मध्यवर्ती भूमिका आहे. यात रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्यातली जुगलबंदी पाहण्यासारखी असेल यात काही शंका नाही.