पुलिसवालोंने झापड मारा, अंडरवर्ल्डने सुपारी निकाला, घडीयाँ भी पहनी, हथकडियाँ भी, ३०८ गर्लफ्रेंड्स थी.. हा ‘संजू’च्या टीझरमधील डायलॉग अनेकांना चांगलाच लक्षात राहिला. कारण ३०८ हा आकडा ऐकूनच अनेकांना धक्का बसला. संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या का असा प्रश्नही अनेकांना पडला. संजूबाबाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एक मजेशीर खुलासा केला आहे. मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्त एक युक्ती वापरायचा आणि ही युक्ती कोणती ती राजकुमार हिरानी यांनी सांगितली आहे.

‘संजय दत्त एखाद्या मुलीला डेट करू लागला की तिला एकदा तो स्मशानात घेऊन जात असे. मुलीची सहानुभूती मिळवण्यासाठी तो तिला आपल्या आईची (नरगिस दत्त) भेट करून देण्यासाठी स्मशानभूमीत आणलं आहे असं सांगत असे. त्यामुळे भावनिकरित्या ती मुलगीसुद्धा संजय दत्तशी जोडली जायची. पण मुळात तिथं नरगिस यांची कबरच नसायची,’ असं हिरानी म्हणाले. मुलींची सहानुभूती मिळवत संजय दत्त त्यांची मनं जिंकत असे. याशिवाय त्याच्या आयुष्यातील असे बरेच किस्से या चित्रपटातून उलगडणार आहेत.

‘संजू’मध्ये मुख्य भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. त्यासोबतच परेश रावल, मनिषा कोईराला, दिया मिर्झा, विकी कौशल, जिम सर्भ आणि अनुष्का शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच २९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader