‘मुन्नाभाई’ चित्रपटाच्या सीरिजपासून राजकुमार हिरानी बॉलिवूडचे यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’ आणि आता ‘संजू’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची मालिकाच हिरानींच्या नावावर आहे. ‘संजू’मुळेच अभिनेता रणबीर कपूरच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं आहे. बऱ्याच फ्लॉप चित्रपटांनंतर हिरानी यांच्या ‘संजू’ चित्रपटाने त्याच्या करिअरला सावरलंय असं म्हटलं जात आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आता ३०० कोटींच्या कमाईकडे वाटचाल करत आहे. या अभूतपूर्व यशानंतर रणबीरनेही हिरानी यांच्या आगामी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, ‘संजू’नंतर राजकुमार हिरानी रणबीरसोबत भविष्यात पाच चित्रपटात काम करणार असल्याचं समजतंय. आता हे पाच प्रोजेक्ट्स कोणते आहेत, त्यात रणबीरची भूमिका कोणती असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. त्यामुळे रणबीर आता हिरानींचा ‘फेव्हरेट हिरो’ झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

Sanju box office collection day 11: ‘संजू’ची ३०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू

सध्या रणबीर आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये पहिल्यांदाच रणबीरसोबत आलिया भट्ट स्क्रिन शेअर करणार आहे. रणबीर- आलियाच्या नात्याविषयी जोरदार चर्चा असतानाच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे.