पद्मावतीचा वाद अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी सिनेमाच्या कथेवर आक्षेप नोंदवला आहे. राजपूत समाजातील नेत्यांनी तर आक्षेप घेत सिनेमावर कायमची बंदी घालण्याची मागणी केली होती. सध्या राजपूत नेता पद्मावती सिनेमाविरोधात एक मोहीम चालवत आहेत. या मोहिमेतंर्गत राजपूत समाजामधून जे कलाकार नावारूपास आले आहेत त्यांना पद्मावती सिनेमाचा विरोध करण्याचे आवाहन ते करत आहेत. ‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, क्षत्रिय समाजाने बाहुबली फेम प्रभासशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या समाजाने प्रभासला पद्मावतीचा विरोध करण्यास सांगितले होते.

राजपूत संघटनांनी प्रभासकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रभास स्वतः क्षत्रिय आहे, त्यामुळे ऑल इंडिया क्षत्रिय महासभा विवादात त्याचे मत जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती. प्रभास दाक्षिणात्य सिनेसृष्टीत फार मोठं नाव आहे. त्यामुळे पद्मावती सिनेमाला जर त्याने विरोध केला तर दाक्षिणात्य प्रेक्षकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण प्रभासने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.

प्रभासने त्याचे काका कृष्णम राजू यांचा सल्ला घेतला. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रभासने यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. त्याने या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिली तर त्याच्या विरोधातले वातावरण निर्माण होऊ शकते. याचा फटका त्याच्या आगामी साहो सिनेमाला बसू शकतो. यामुळेच त्याने या वादावर आपले कोणतेही मत दिले नाही.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब यांच्या पाठोपाठ आता गुजरातमध्येही पद्मावती प्रदर्शित होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ही माहिती दिली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती सिनेमावर राजपूत समाजाने आक्षेप घेतला आहे. पद्मावती सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा दावा करणी सेनेने केला आहे. त्यामुळे हा सिनेमा वादात सापडला आहे.

या सिनेमाबद्दल रुपाणी यांनी ट्विट केले आहे. ‘राजपूत समाजाच्या भावना लक्षात घेऊन गुजरात सरकार पद्मावती सिनेमा राज्यात प्रदर्शित करण्याची परवानगी देणार नाही. इतिहास तोडूनमोडून तो लोकांसमोर सादर करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही. आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. मात्र त्या नावाखाली आमच्या महान संस्कृतीशी तडजोड होऊ शकत नाही. हे कदापि सहन केले जाणार नाही,’ असे रुपानी यांनी ट्विटमध्ये म्हटले.