रुपेरी पडद्यावर एकाहून एक दमदार कौटुंबिक कहाण्या मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘राजश्री प्रॉडक्शन’ने काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘हम चार’ असं या चित्रपटाचं नाव असून त्यातील कलाकारांसोबत पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून राजश्रीने चार नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.
प्रित कमानी, सिमरन शर्मा, अन्शुमन मल्होत्रा आणि तुषार पांडे हे चार नवीन चेहरे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर राजश्रीने ‘हम चार’ या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट कुटुंब आणि मैत्री या संकल्पनांवर आधारित असल्याचं समजतंय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक दीक्षित करणार आहे. तर सूरज बडजात्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.
Release date finalised: 15 Feb 2019… Rajshri introduces four new talents in its forthcoming film #HumChaar: Prit Kamani, Simran Sharma, Anshuman Malhotra and Tushar Pandey… Directed by Abhishek Dixit… Sooraj R Barjatya is the creative producer. pic.twitter.com/H9CXwPVBo2
— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2019
‘राजश्री प्रॉडक्शनसाठी काम करणं आणि कुटुंबाची परिभाषा सांगणाऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा अनुभव नक्कीच उत्तम असेल. आजच्या काळात अशा प्रकारच्या चित्रपटांची परंपरा राजश्रीने आजवर कायम राखली आहे,’ असं अभिषेक म्हणाले.
‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ असे सुपरहिट चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने आजवर दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. राजश्रीच्या बहुतांश चित्रपटांमध्ये सलमान मुख्य भूमिकेत दिसतो. त्यामुळे आता ‘हम चार’मध्ये चार नवीन कलाकारांची वर्णी लागल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.