दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार राम चरण तेजाचा जन्म २७ मार्च १९८५ मध्ये चेन्नई येथे झाला. तो तेलगू सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा नावाजलेला चेहरा म्हणून राम चरणकडे पाहिले जाते. त्याने प्रियांका चोप्रासोबत जंजीर सिनेमात काम केले होते. हा त्याचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. हा सिनेमा सपशेल अपयशी ठरला होता. यानंतर राम चरणने हिंदी सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली. त्याच्या वाढदिवसा दिवशी राम चरणच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

https://www.instagram.com/p/BYNWT6yFvnF/

राम चरणने २००७ मध्ये ‘चिरुथा’ सिनेमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा दुसरा सिनेमा एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘मगधीरा’ हा होता. या सिनेमातून राम चरणची लोकप्रियता वाढत गेली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील महागड्या कलाकारांमध्ये राम चरणचे नाव आवर्जुन घेतले जाते. त्याने ‘ऑरेंज’, ‘नायक’, ‘येवादु’, ‘ध्रुवा’, ‘खिलाडी नंबर १५०’ अशा सिनेमांमध्ये काम केले आहे.

https://www.instagram.com/p/Bfh0j0rlNpi/

त्याचा आगामी ‘रंगस्थलम’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमात त्याच्यासोबत समांथा रूथ प्रभूही दिसणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये दोघांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगली होती. येत्या ३० मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानंतर तो राजामौली यांच्या आगामी सिनेमातही प्रमुख भूमिका साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/BgiHzjbFy_H/

असे म्हटले जाते की, राम चरण ९० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या आलिशान बंगल्यात राहतो. या बंगल्यात अनेक अत्याधुनिक सोयी- सुविधा आहेत. राम चरणने बंगल्याच्या भिंतींना महागडे पेन्टिंग लावले आहे. २०१२ मध्ये त्याने उपासना कमिनेनीसोबत लग्न केले होते. उपासना अपोलो रुग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप रेड्डी यांची नात आहे. उपासना स्वतः अपोलो चॅरिटीची उपाध्यक्ष आहे आणि बी पॉझिटीव्ह मासिकाची संपादिका आहे.

https://www.instagram.com/p/Bgp53QBFumE/

रामचरणचं टोपण नाव चेरी आहे. त्याला सिनेसृष्टीत मेगापॉवर स्टार ही उपाधीही दिली गेली आहे. राम चरणनचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे. अभिनेत्यासोबतच तो एक व्यावसायिकही आहे. तो हैदराबाद येथील पोलो रायडिंग क्लबचा मालक असून चॅनल ‘मां टीव्ही’च्या संचालक मंडळातील एक सदस्या आहे.