गेल्या काही दिवसांमध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमित राम रहिम याच्या एकाहून एक सुरस कथा समोर येताना दिसत आहेत. यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी साधारणपणे एक ते दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, बाबा राम रहिमसाठी हा डाव्या हाताचा मळ होता, असेच म्हणावे लागेल.

आपल्याला अध्यात्मापासून ते विज्ञानापर्यंत अनेक विषयांचे आणि कलांचे ज्ञान असल्याचा दावा तो नेहमीच करायचा. त्यामुळेच त्याचे चित्रपट म्हणजे दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत ‘सबकुछ राम रहिम’ असाचा मामला असायचा. तो स्वत:च चित्रपटाची कथा लिहायचा, दिग्दर्शन करायचा. एवढेच काय चित्रपटातील गाणी आणि भूमिकांवरही आपलेच वर्चस्व कसे राहील, याची पुरेशी काळजी तो घ्यायचा. हे सर्व पाहता बॉलिवूडमध्ये नक्कीच त्याचा इतका हरहुन्नरी कलावंत शोधून सापडणार नाही.

राम रहीमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची गाथा एवढ्यावरच संपत नाही. टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील ‘बिग बॉस’चा खरा चेहरा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र, राम रहिमने हा कार्यक्रम पाहिल्यानंतर स्वतःच ‘बिग बॉस’ होण्याचे ठरवले. असे बोलले जाते की, तो त्याच्या आश्रमात ‘बिग बॉस’ हा खेळ खेळायचा. यात सहभागी होणाऱ्या भक्तांना तो एका महिन्यासाठी घरात ठेवायचा. या शोचा तो सूत्रसंचालक आणि परीक्षक साहजिकच बाबा राम रहिम हाच असायचा. या शोदरम्यान तो भक्तांना त्याच्या मनाप्रमाणे वागायला सांगायचा.

सीबीआय न्यायालयात दोषी ठरलेला गुरमित राम रहिम लवकरच ‘सुभाषचंद्र बोस’ यांच्यावरही सिनेमा करणार होता. या सिनेमामार्फत तो बंगाली सिनेसृष्टीत आपले बस्तान बसवू इच्छित होता. पण बंगाली सिनेमात काम करण्यापूर्वी त्याने ‘एमएसजी’मार्फत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रहिम नोव्हेंबरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर सिनेमा करण्यास सुरूवात करणार होता. आधीच्या सिनेमांप्रमाणेच या सिनेमाचे लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन त्याचेच असणार होते. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्याचा मानस होता.